करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता ‘साखर कारखान्यांनी कोविड काळजी केंद्र सुरु करावेत’ असे आवाहन नुकतेच शरद पवार यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देताना कोल्हापूर जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. दौलत देसाई यांनी सोमवारी जिल्ह्यातील साखर कारखान्यांना १०० खाटांचे अद्यावत कोविड काळजी केंद्र सुरू करण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्यामुळे, जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांच्या माध्यमातून आगामी काळात २,३०० करोना रुग्णांची सोय होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्याच्या सर्व भागांमध्ये करोनाचा प्रसार वाढत चालला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही ही संख्या वाढत आहे. रविवारी कराड येथे झालेल्या एका बैठकीत शरद पवार यांनी साखर कारखान्यांनी रुग्णांसाठी करोना उपचार केंद्र सुरू करावेत, अशी सूचना केली होती. त्याची कोल्हापूर जिल्ह्यात लगेचच कार्यवाही होत आहे. जिल्हाधिकारी देसाई यांनी सोमवारी सायंकाळी एक पत्र साखर कारखान्यांना पाठवले आहे. त्यामध्ये त्यांनी शंभर खाटांचे ऑक्सिजनेटेड काळजी केंद्र सुरू करावे, अशी सूचना केली आहे.

आगामी ऊस गळीत हंगामासाठी येणाऱ्या ऊसतोड मजूर, वाहन चालक यांच्यासाठीही याचा उपयोग होईल, असे या पत्रामध्ये म्हटले आहे. ज्या कारखान्यांमध्ये जागेची सोय नाही तेथे तहसिलदारांनी इमारत उपलब्ध करून द्यावी, अशी सूचनाही यामध्ये केली आहे. यामुळे जिल्ह्यातील करोना रुग्णांना एक आधार मिळताना दिसत आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid care center to be start in sugar factories of kolhapur district factories responded to sharad pawar appeal aau