कोल्हापूर : साक्षर होण्याचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याची व असाक्षरतेचा कलंक पुसण्याची संधी ‘सर्वांसाठी शिक्षण’ या उपक्रमातून १५ वर्षे व त्या पुढील ज्येष्ठांना मिळत आहे. यावर्षी या उपक्रमात एक लाखाहून अधिक नोंदणी झाली आहे. प्रौढ शिक्षण ऐवजी ‘सर्वांसाठी शिक्षण’ या नावाने सुरू असलेल्या उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत चालू शैक्षणिक वर्षात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (एफएलएनएटी) ही परीक्षा रविवारी २३ मार्च रोजी महाराष्ट्र राज्यात केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आली आहे. साक्षर होण्याचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याची व असाक्षरतेचा कलंक पुसण्याची संधी या निमित्ताने पंधरा वर्षे व त्या पुढील जेष्ठांना मिळाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत उल्लास कार्यक्रमाचे राज्य समन्वयक राजेश क्षीरसागर यांनी सांगितले की, मागील शैक्षणिक वर्षात ही परीक्षा १७ मार्च २०२४ रोजी घेण्यात आली होती. वर्षातून दोन वेळा म्हणजे सप्टेंबर व मार्च महिन्यात केंद्र शासनाकडून या परीक्षेचे आयोजन करण्यात येते.असाक्षर व स्वयंसेवक ऑनलाइन नोंदणी उल्लास ॲपवर वर्षभर सुरू असते. ज्या शाळेतून असाक्षरांची नोंदणी झाली आहे त्याच शाळेत त्यांना परीक्षा केंद्र देण्यात येते. येत्या रविवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत असाक्षरांनी त्यांच्या सोयीने परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून परीक्षा द्यायची आहे.

राज्य मंडळाकडून घेतली जाणारी इयत्ता बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत तर इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत संपन्न झाली आहे. त्यानंतर आता शालेय शिक्षण विभागातील सर्व यंत्रणा ज्येष्ठांच्या परीक्षेसाठी कामाला लागली आहे. मागील शैक्षणिक वर्षात १७ मार्च रोजी झालेल्या एफएलएनएटी परीक्षेस राज्यातून ४ लक्ष ५९ हजार इतके प्रौढ असाक्षर परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ४ लक्ष २५ हजार उत्तीर्ण झाले. ही लेखी परीक्षा एकूण १५० गुणांची असून वाचन ५०, लेखन ५०, व संख्याज्ञान ५० अशी गुणविभागणी आहे. प्रत्येक भागात १६.५ व एकूण ४९.५ गुण उत्तीर्णतेसाठी आवश्यक आहेत.

चालू शैक्षणिक वर्षात ५ लक्ष ७७ हजार इतक्या असाक्षरांच्या नोंदणीचे राज्याने उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी १९ मार्च अखेर ५ लक्ष ६४ हजार ७५१ नोंदणी झाली आहे. त्यात १ लक्ष ६१ हजार ४६१ पुरुष तर ४ लक्ष ३ हजार ११७ स्त्रिया आणि ७३ तृतीयपंथीयांची नोंदणी झाली आहे.मागील वर्षी नोंदणी झालेले परंतु परीक्षेस बसू न शकलेले, तसेच मागील वर्षात उत्तीर्ण होऊ न शकलेले आणि चालू वर्षात नव्याने नोंदणी झालेले असे एकूण सुमारे ८ लक्ष ४ हजार एवढे असाक्षर परीक्षेस प्रविष्ट करण्याचे राज्याने उद्दिष्ट ठेवले आहे. असाक्षरांना शिकवण्यासाठी स्वयंसेवक म्हणून१ लक्ष ३३ हजार १४२ जणांची नोंदणी झाली आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी आणि योजना शिक्षण संचालक डॉ.महेश पालकर यांनी संयुक्तपणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळांवरही उल्लास कार्यक्रमाची जबाबदारी सोपवल्याने या कार्यक्रमास आणखी गती मिळत आहे. योजना शिक्षण संचालनालयाने या परीक्षेसाठी राज्यस्तरावरून जिल्हानिहाय परीक्षा निरीक्षकांच्या निमित्त केल्या आहेत. शिवाय केंद्र शासन स्तरावरून महाराष्ट्रातील परीक्षेची पाहणी करण्यासाठी केंद्रीय निरीक्षक येणार आहेत.

कोल्हापूर विभागांतर्गत सातारा २३,२५२, सांगली १७,७८०, कोल्हापूर २९,६८०,रत्नागिरी १०,५७४ आणि सिंधुदुर्ग ६,५९६ अशा एकूण ८७,८८२असाक्षरांची परीक्षा घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याबाबत कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि विभागीय उपसंचालक महेश चोथे यांनी विभागातील जिल्ह्यांसाठी ऑनलाइन बैठक घेऊन संयुक्तपणे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. राज्यस्तरावरून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह शालेय शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांना या परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.

उल्लास परीक्षेच्या सरावासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने सराव प्रश्नपत्रिका ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे आता असाक्षर आजी-आजोबा, आई-बाबा, काका-मामा, काकू आणि मावशी आपल्या पाल्यांसोबत अन् स्वयंसेवकांसोबत अभ्यासात गुंग झाले आहेत.

“असाक्षर व स्वयंसेवक नोंदणी आणि जोडणी उल्लास ॲपवर ऑनलाईन पद्धतीने शाळांमार्फत सुरू आहे. ज्यांची नोंदणी व जोडणी अद्याप होणे बाकी आहे, त्यांनी तातडीने करावी. परीक्षेचा सराव करावा. -राजेश क्षीरसागर, राज्य समन्वयक तथा विभागीय अध्यक्ष कोल्हापूर व कोकण मंडळ.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur chance to become literate under central government s ullas program for 15 years or more age persons css