कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील भाजपचे प्रमुख नेते आपल्या राजर्षी शाहू विकास आघाडीच्या छावणीत आणण्यात यशस्वी ठरल्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेचे समर्थक आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आता उद्धव ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनाही आपल्या गोटात दाखल केले आहे.

शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, जयसिंगपूर आणि शिरोळ नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांना वेग येत असून शाहू आघाडीची बाजू भक्कम होत चालली आहे. आज सायंकाळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राज्य संघटक चंगेजखान पठाण, माजी जिल्हाप्रमुख, जिल्हा संघटक वैभव उगळे, कुरुंदवाड शहरप्रमुख बाबासो सावगावे यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या महायुती – राजर्षी शाहू विकास आघाडीला पाठिंबा दर्शवला. तसेच, शिरोळ तालुक्यातील शिरोळ, जयसिंगपूर व कुरुंदवाड या नगरपालिकांच्या निवडणुका एकत्रितपणे लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यामुळे तालुक्यातील महायुती राजर्षी शाहू आघाडीची ताकद लक्षणीयपणे वाढली आहे.

याप्रसंगी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले, नगरपालिका निवडणुकीत कोणत्याही गट-तटाचा विचार न करता शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत आहोत. शहराच्या प्रगतीसाठी जे लोक विश्वासाने पुढे येत आहेत त्यांचे स्वागत करतो.

याप्रसंगी रामचंद्र डांगे, जवाहर पाटील, चंद्रकांत जोंग, दीपक गायकवाड, अजित देसाई, उदय डांगे, बाळासो गायकवाड यांसह ठाकरे गट, शाहू आघाडीचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काँग्रेसच्या अध्यक्षांचा पाठिंबा

दरम्यान, जयसिंगपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष अमरसिंह निकम यांनीही यड्रावकर यांच्या शाहू आघाडीला पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्या गेल्या आठवड्यात झालेल्या शिरोळ दौऱ्यावेळी निकम आघाडीसमवेत होते.

दरम्यान, केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार असल्यामुळे जयसिंगपूर नगरपालिकेची निवडणूक महायुतीसोबत पण राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून महायुतीमधील सर्व घटक पक्षांना बरोबर घेऊन लढवणार असल्याची घोषणा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केली. जयसिंगपूर येथे आयोजित एका बैठकीवेळी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले, की जयसिंगपूर शहराचा विकास साधत असताना प्रत्येक मूलभूत गरजा पाहून शहराचा सर्वांगीण विकास साधला आहे. या शहरात महायुतीमधील घटक पक्ष व राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवून सत्ता निश्चितपणे आणली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जयसिंगपूर नगरपालिकेसाठी २६ उमेदवार आणि १ नगराध्यक्ष पदाचा उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. हे २७ उमेदवार महायुतीतील घटक पक्षांचे असतील. शहराचा विकास साधायचा असेल तर आपल्या विचाराचे सरकार राज्यात आणि केंद्रात असणे गरजेचे असते. तरच मोठ्या प्रमाणात निधी आणता येतो, असेही त्यांनी सांगितले.