कोल्हापूर : मेघगर्जनेसह जोरदार पावसाने शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यात हजेरी लावली. ‘ऑक्टोबर हिट’मुळे उष्मा वाढला असताना मुसळधार पावसानंतर हवेत कमालीचा गारठा निर्माण झाला. त्यातून हिवाळ्याची चाहूल दिसून आली.
आज सकाळपासून हवेत उकाडा जाणवत होता. दुपारनंतर ढगांचा गडगडाट होत पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला पावसाची गती कमी होती. नंतर मुसळधार पावसामुळे परिसर जलमय झाला.
जिल्ह्याच्या सर्वच भागाला पावसाने झोडपून काढले आहे. संततधार पावसामुळे भाविक, पर्यटकांची तारांबळ उडाली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी पावसाने हजेरी लावली होती. आजही तो मोठ्या प्रमाणात पडला.
जोरदार पावसामुळे दिवाळीचा आनंद हिरावला गेला. रस्त्यावरील गर्दी लक्षणीय प्रमाणात रोडावली. दिवाळी संपली तरी पाऊस हटायला तयार नाही. पाऊस सतत पडत राहिल्याने यंदाचा ऊस गळीत हंगाम सुरू होण्यावरही त्याचा परिणाम होणार आहे.
