कोल्हापूर : ऊस दर प्रश्नी तोडगा काढण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी आयोजित केलेली तिसरीही बैठक निष्फळ ठरली. साखर कारखानदारांनी दिलेला प्रस्ताव अमान्य असल्याचे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा केली.मागील वर्षीच्या ऊस गळीत हंगामासाठी प्रतिटन एफआरपी पेक्षा ४०० रुपये अधिक द्यावेत आणि चालू गळीत हंगामासाठी एफआरपी एक रकमी ३५०० रुपये द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे गेले तीन आठवडे कारखान्याचे गाळप थांबले आहे.  ऊस पट्ट्यामध्ये कमालीची अस्वस्थता आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखानदारांचे प्रतिनिधी व शेतकरी संघटना यांच्या बैठका घेतल्या होत्या. मात्र त्यामध्ये कोणताही निर्णय झाला नव्हता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने बैठक झाली. आमदार सतेज पाटील, माजी आमदार के. पी.  पाटील, गणपतराव पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, माधवराव घाटगे, राहुल आवाडे आदी साखर कारखान्याचे प्रतिनिधी तसेच  जिल्हाधिकारी राहुल रेखावर, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, साखर सहसंचालक अशोक गाडे आदी अधिकारी उपस्थित होते. 

हेही वाचा >>>मटन खरेदीसाठी कोल्हापूरकरांच्या रांगा; भाऊबीज झणझणीत होणार

मागील रकमेवर बिनसले

बैठकीला सुरुवात होताच दराच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाल्याने शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी बैठक सोडण्याचा निर्णय घेतल्याने तणाव निर्माण झाला होता.  हा वाद पोलिसांनी थांबवला. यावर्षीच्या हंगामासाठी काही रक्कम वाढवून देण्याची तयारी साखर कारखानदारांनी दर्शवली. आधी मागील वर्षीच्या गाळपसाठी अधिक रक्कम किती देणार हे पहिला स्पष्ट करा, या मुद्द्यावर राजू शेट्टी आग्रही राहिले. त्यावर अखेरपर्यंत तोडगा निघू शकला नसल्याने ही तिसरी बैठक निष्फळ ठरली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची एक समिती शेतकऱ्यांना अधिक रक्कम कशी देता येईल याचा निर्णय घेणार आहे. ही समिती मान्य नसल्याचे शेट्टी यांनी पत्रकारांना सांगितले. ऊस तोडी बंद आंदोलन सुरू राहणार असून तीव्रता वाढवण्यासाठी रविवारी राज्यभर सर्वत्र चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The meeting held at the kolhapur collector office to resolve the sugarcane rate issue was fruitless amy