ICC World Cup 2023: क्रिकेटच्या महाकुंभाचा बिगुल वाजायला दोन दिवस उरले आहेत. भारत चौथ्यांदा आणि १२ वर्षांनंतर प्रथमच एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर असे ४६ दिवस क्रिकेटची मेजवानी चाहत्यांना अनुभवायला मिळवणार आहे. या कालावधीत १० शहरांमध्ये १० संघांमध्ये ४८ सामने खेळवले जाणार आहेत. १९७५ मध्ये इंग्लंडमध्ये क्रिकेट विश्वचषक सुरू झाला तेव्हा २००७ पर्यंत कोणताही यजमान देश विश्वविजेता होऊ शकला नाही. २०११ मध्ये भारताने हा ट्रेंड मोडला आणि जगज्जेता बनणारा पहिला यजमान देश बनला. तेव्हापासून २०१९च्या शेवटच्या विश्वचषकापर्यंत केवळ यजमान देशालाच विश्वविजेते बनण्याचा मान मिळत आहे. यावेळी भारत यजमान आहे, ही वस्तुस्थिती आहे, पण बरेच काही योगायोग टीम इंडियाच्या बाजूने आहे.
भारतीय संघ तिसर्या विजेतेपदासाठी प्रयत्नशील असेल
विश्वचषकाच्या इतिहासात भारत हा ऑस्ट्रेलियानंतरचा सर्वात यशस्वी संघ आहे. १९८३ आणि २०११ मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाला २००३च्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. भारतीय संघ चार वेळा उपांत्य फेरीत पोहोचला आहे. १९८७ मध्ये इंग्लंडने, १९९६ मध्ये श्रीलंकेने, २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियाने आणि २०१९ मध्ये न्यूझीलंडने पराभूत केले होते. २००७ पासून, भारतीय संघाने प्रत्येक विश्वचषकात उपांत्य फेरीपर्यंत किंवा त्यापुढेही प्रवेश केला आहे.
नामवंत क्रिकेटपटू: संघ रोहित शर्मा, विराट कोहली, शुबमन गिल, के.एल. राहुल, जसप्रीत बुमराह,
कमजोरी: आशिया चषकापूर्वी संघाची मधली फळी ही चिंतेची बाब होती, पण राहुल आणि इशान किशनच्या पुनरागमनाने तेही दूर केले आहे. संघ समतोल दिसत असला तरी फलंदाजीच्या क्रमात खोली नसणे ही चिंतेची बाब ठरू शकते. फलंदाजी बिघडली तर कुलदीप, बुमराह, सिराज यांच्याकडूनही योगदानाची अपेक्षा करावी लागेल.
कर्णधार- रोहित शर्मा
विश्वचषक विजेता-१९८३, २०११
ऑस्ट्रेलिया
पाचवेळा विश्वविजेता होण्याचे ओझे ऑस्ट्रेलियावर असेल
ऑस्ट्रेलिया विश्वचषकातील सर्वात यशस्वी संघ आहे. १९८७ मध्ये भारत विश्वविजेता बनल्यानंतर, ऑस्ट्रेलियाने १९९९, २००३, २००७ मध्ये विजेतेपदांची हॅटट्रिक केली आणि २०१५ मध्ये आपल्याच देशात विश्वविजेता बनला. २०१९ मध्ये उपांत्य फेरीत त्यांचा पराभव झाला.
स्टार क्रिकेटपटू: मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल,
कमजोरी: विश्वचषकापूर्वी भारतासोबतच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत अनुभवी स्टीव्ह स्मिथची अनुपस्थिती ऑस्ट्रेलियासाठी चिंतेची बाब ठरू शकते.
कर्णधार- पॅट कमिन्स
विश्वचषक विजेता-१९८७, १९९९, २००३, २००७, २०१५
इंग्लंड
विजेतेपद वाचवण्याची जबाबदारी बटलर आणि स्टोक्स यांच्या खांद्यावर आहे.
विश्वचषकाचा जनक असलेला इंग्लंड २०१९ मध्ये प्रथमच आपल्याच घरात विजेता ठरला. आपले जेतेपद कायम राखण्याचे आव्हान इंग्लंडसमोर आहे. हे काम सोपे होणार नाही. विश्वचषक स्पर्धेत गेल्या १६ वर्षांत कोणत्याही गतविजेत्या संघाला आपले विजेतेपद राखण्यात यश आलेले नाही. इंग्लंडने १९७९, १९८७, १९९२ विश्वचषकांची अंतिम फेरीही गाठली होती.
स्टार क्रिकेटपटू: इंग्लंडमध्ये कर्णधार म्हणून जोस बटलर आणि अष्टपैलू बेन स्टोक्ससारखे क्रिकेटपटू आहेत. या विश्वचषकात खेळण्यासाठी स्टोक्स निवृत्तीतून बाहेर पडत आहे. आपले सर्वोत्तम देण्यासाठी तो कोणतीही कसर सोडणार नाही. दोन्ही क्रिकेटपटूंनी एकहाती सामना फिरवण्याची क्षमता यापूर्वीच दाखवली आहे. लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन देखील त्यांच्या दिवसात काहीही करू शकतात.
कमजोरी: इंग्लंडने भारतीय भूमीवर तीन वर्षांपासून एकदिवसीय क्रिकेट खेळलेले नाही. हॅरी ब्रूक आणि डेव्हिड मलानसारख्या क्रिकेटपटूंना वनडेत आपली योग्यता सिद्ध करावी लागेल.
कर्णधार-जोस बटलर
विश्वचषक विजेता-२०१९
न्यूझीलंड
यावेळी न्यूझीलंडला नशीब साथ देईल?
विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी संघांबद्दल बोलायचे झाल्यास, न्यूझीलंडचे नाव अग्रस्थानी असेल. हा संघ मागील दोन विश्वचषकातील अंतिम फेरीत असून २००७ पासून प्रत्येक विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पर्यंत पोहचला आहे, परंतु आजपर्यंत त्यांना विश्वविजेते होण्याची संधी मिळालेली नाही. मागील दोन विश्वचषकात ते उपविजेते होते.
स्टार क्रिकेटपटू: न्यूझीलंडचे ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉनवे यांच्यावर अधिक अवलंबून असेल. हे दोन्ही क्रिकेटपटू आयपीएलमध्ये भारतीय खेळपट्ट्यांवर चांगली कामगिरी करत आहेत. न्यूझीलंडमध्ये रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, मिचेल सँटनर, जिमी नीशम सारखे क्रिकेटपटू देखील आहेत जे बॉल आणि बॅट दोन्हीमध्ये योगदान देऊ शकतात.
कमजोरी: १५ सदस्यीय संघात १२ क्रिकेटपटू आहेत ज्यांनी वयाची ३० वर्षे ओलांडली आहेत. याकडे सकारात्मक दृष्टीने पाहता हा सर्वात अनुभवी संघ असला तरी भारतीय खेळपट्ट्या आणि परिस्थितीमध्ये दुखापतींपासून बचाव करणे हे या क्रिकेटपटूंसाठी सर्वात मोठे आव्हान असेल. कर्णधार केन विल्यमसनही दुखापतीतून सावरला आहे. त्यांना त्यांचा फॉर्म सिद्ध करावा लागेल.
कर्णधार-केन विल्यमसन
उपविजेता-२०१५, २०१९
मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 46 days 48 matches and one champion india can repeat history after 12 years record remains intact for three world cups avw