मुंबईकर अमोल मुझुमदार हे नाव सच्च्या क्रिकेटरसिकांना नवीन नाही. टीम इंडिया कॅपचा हकदार होण्याची क्षमता आणि तयारी असलेला, डोमेस्टिक क्रिकेटमधला लढवय्या. वर्षानुवर्ष धावांची टांकसाळ उघडूनही अमोलला टीम इंडियाला दरवाजे किलकिले झाले नाहीत. मात्र हा सल मनात ठेऊन कडवट होण्याऐवजी त्याने आपल्या अनुभवाचा फायदा पुढच्या पिढीला करून द्यायचं ठरवलं. खेळणं थांबवल्यानंतर अमोल समालोचन करू लागला. मात्र काळानंतर ते थांबवून त्याने प्रशिक्षक होण्याचा निर्णय घेतला. खेळावर बोलण्याऐवजी विजेते घडवण्याचा ध्यास त्याने घेतला आणि आजच्या घडीला विश्वविजेतेपदाच्या संघाचा प्रशिक्षक होण्याचं स्वप्न काही तासांवर आहे. भारतीय महिला संघाच्या फायनलपर्यंतच्या वाटचालीत अमोलचा वाटा सिंहाचा आहे. २०२३ मध्ये अमोल यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा हाती घेतली. प्रशिक्षकपदाची संगीत खुर्ची अमोल यांच्या नियुक्तीने थांबली. अमोल यांच्या नियुक्तीने महिला संघाला आवश्यक असलेला शांत, संयमी ठहरावी मार्गदर्शक मिळाला. अमोल यांच्या शिकवणीमागे वर्षानुवर्षांची तपश्चर्या आहे.
सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी ही जोडगोळी मुंबई क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवत असताना अमोलही खेळत होता. १९८८ मध्ये या जोडीने हॅरिस शील्ड या मुंबईतल्या शालेय क्रिकेट स्पर्धेत तिसऱ्या विकेटसाठी ६६४ धावांची मॅरेथॉन भागीदारी रचली. सचिन तेव्हा शारदाश्रम शाळेसाठी खेळायचा. या विक्रमी भागीदारीमुळे सचिन-विनोद ही नावं क्रिकेटच्या नभांगणात पहिल्यांदा झळाळून निघाली. एकेरी-दुहेरी धावा आणि चौकार-षटकार यांचा सुरेख मिलाफ मैदानावरल्या चाहत्यांना पाहायला मिळाला. सचिन-विनोद जोडीने जवळपास दोन दिवस बॅटिंग केली. तेव्हा या दोघांच्याच वयाचा एक मुलगा पॅड घालून आपल्याला बॅटिंग कधी मिळणार, याची वाट पाहत बसला होता. त्याचं नाव अमोल मुझुमदार. शालेय क्रिकेटमधल्या या ऐतिहासिक क्षणाचा अमोल साक्षीदार झाला, पण तेव्हापासूनच त्याच्या नशिबी प्रतीक्षा करणं चिकटलं.
सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, सौरव गांगुली हे दिग्गज भारतीय संघाकडून खेळू लागले, मोठे झाले त्याच काळात अमोलही डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करत होता. त्याच्या नावाची अनेकदा चर्चाही झाली. डोमेस्टिक क्रिकेटमधली अमोलची आकडेवारी पाहिली तर अचंबित व्हायला होतं. १७१ फर्स्ट क्लास सामन्यात १११६७ रन्स. ४८ची सरासरी, ३० शतकं आणि ६० अर्धशतकं. इतकं काही करणारा माणूस भारतासाठी नक्कीच खेळला असेल असं वाटू शकतं पण अमोलच्या नशिबात टीम इंडियाची कॅप नव्हती. मुंबईला भारतीय क्रिकेटची नर्सरी म्हटलं जातं. मुंबईने अनेक कसोटीवीर भारताला दिले. या यादीत अमोलचं नाव असायलाच हवं होतं. पण दुर्देवान तसं झालं नाही. भारतासाठी न खेळलेले टॉप ५ क्रिकेटपटू या यादीत अमोलचं नाव हमखास असतं.
क्रिकेटविश्वात द्रोणाचार्य म्हणून प्रसिद्ध रमाकांत आचरेकर सरांकडे अमोलने क्रिकेटची धुळाक्षरं गिरवली. १९९३-९४ मध्ये फरीदाबाद इथं अमोलने मुंबईसाठी पदार्पण केलं. पहिल्यात सामन्यात त्याने २६० धावांची खेळी केली. हा एका खेळीचा चमत्कार नव्हता, हे अमोलने पुढचे असंख्य हंगाम सिद्ध केलं.
सचिनने १९८९-९० मध्ये पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केलं. द्रविड आणि गांगुली यांनी १९९६ मध्ये लॉर्ड्स इथं पदार्पण केलं. त्याच हंगामात लक्ष्मणने अहमदाबाद इथे कारकीर्दीचा श्रीगणेशा केला. स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शनाच्या जोरावर या चौघांनी राष्ट्रीय संघात स्थान पटकावलं. प्रवेश केल्यानंतर या चौघांनी सातत्यपूर्ण प्रदर्शन केलं, त्यामुळे त्यांना वगळण्याचा प्रश्नच उद्भवला नाही.
या काळात मुंबईकर प्रवीण आमरे आणि विनोद कांबळी यांनी राष्ट्रीय संघात स्थान पटकावलं. दोघांनीही खणखणीत सुरुवात केली. मात्र क्षमतेनुरूप त्यांची कारकीर्द बहरलीच नाही. सचिन, राहुल आणि सौरव या तिघांनी कारकीर्दीच्या दुसऱ्या टप्प्यात कर्णधारपदाचा मुकूटही सांभाळला. चौघेही पदार्पणापासून कर्तृत्वाने मोठे होत गेले आणि कसोटी संघात ३-४-५-६ या जागांसाठी दुसऱ्या कुणाचा विचार करण्याची वेळ निवडसमितीवर आलीच नाही.
या काळात निवडसमितीने ओपर्नसच्या बाबतीत प्रयोग केले. अमोलकडे तंत्र होतं, स्थानिक क्रिकेटमध्ये धावा होत्या. मधल्या फळीत खेळणाऱ्या खेळाडूला ओपनर करण्याचा प्रयोग वीरेंद्र सेहवागच्या बाबतीत केला गेला. तो यशस्वी झाला. मात्र अमोलच्या नशिबी ती संधीही नव्हती.
१९९३-९४ ते १९९९-२००० या कालावधीत अमोलचे आकडेवारी पाहून हा ‘पुढचा तेंडुलकर’ असं वर्णन केलं जायचं. तो धावा करत राहिला परंतु राष्ट्रीय संघाचं स्वप्न दूरच राहिलं.सातत्यपूर्ण कामगिरीमुळे अमोलकडे मुंबईचं कर्णधारपद सोपवण्यात आलं. विकेटची किंमत जपणाऱ्या अमोलने ही जबाबदारीही समर्थपणे सांभाळली. त्याच्या कारकीर्दीत मुंबईला अनेकदा जेतेपद मिळवून दिलं.
मुंबई आणि क्रिकेट या दोन गोष्टी अमोलसाठी श्वासासारख्या होत्या. या दोन्हींचा त्याग करून त्याने आसामसाठी खेळण्याचा निर्णय घेतला. फर्स्ट क्लास क्रिकेटमधल्या दिग्गजांमध्ये गणना होणारा अमोल आसामसाठी खेळताना दिसला. दोन हंगांमानंतर त्याने आंध्रकरता खेळण्याचा निर्णय घेतला. अमोलच्या बॅटिंगइतकंच त्याच्या अनुभवाचा दोन्ही संघांना प्रचंड फायदा झाला.
२००८मध्ये देशभरात IPLचे वारे वाहू लागले. त्यावेळी अमोल मुंबई संघाचा कर्णधार होता. नावंही ठाऊक नसलेल्या अनेक खेळाडूंना IPLची दारं उघडी झाली. मात्र आयपीएल संघांनी अमोलचं मूल्य जाणलं नाही. त्यानंतरही त्याने धावा करण्याचा वसा सोडला नाही. वाढतं वय आणि ढासळणाऱ्या फॉर्मच्या पार्श्वभूमीवर अमोलने २५ सप्टेंबर २०१४ला क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला.
खेळाडू म्हणून निवृत्त झाला तरी अमोलचं क्रिकेटशी असलेलं सख्य कमी झालं नाही. भारताच्या U19 आणि U23 संघांना त्याचं मार्गदर्शन मिळालं आहे. नेदरलँड्स संघाच्या प्रशिक्षणाचं काम तो पाहत होता. IPL स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाचा बॅटिग कोच म्हणून त्याने काम पाहिलं. यादरम्यान अमोल खेळावर बोलण्याचं म्हणजे कॉमेंट्रीचं कामही त्याने केलं. दोन वर्षांपूर्वी भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजदरम्यान अमोल दक्षिण आफ्रिका संघाचा बॅटिंग कोच होता. अमोल, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही याचा बाऊ करत बसण्यापेक्षा दक्षिण आफ्रिकेने त्याच्या ज्ञानाचा, अनुभवाचा, कर्तृत्वाचा उपयोग करून घेतला.
काही दिवसांपूर्वीच भारतीय संघात संधी मिळाली नाही म्हणून एका युवा क्रिकेटपटूने नाराजी प्रकट केली होती. व्यावसायिक क्रिकेट खेळायला लागून वर्षभरातच त्याने निवडसमितीवर तोंडसुख घेतलं होतं. अमोल असं कधीच वागला नाही.
