एकदिवसीय विश्वचषक २०२३ या स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार विश्वचषक स्पर्धेचे सामने भारतात एकूण १२ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. परतु विश्वचषक स्पर्धेतील एकही सामना नागपुरात खेळवला जाणार नाही. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनिल देशमुख म्हणाले, नागपुरात विश्वचषक स्पर्धेचा एकही सामना खेळवला जाणार नाही ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे.
अनिल देशमुख म्हणाले, विश्वचषक स्पर्धेचे मुंबईत, पुण्यात, अहमदाबादसह संपूर्ण भारतात सामने खेळवले जाणार आहेत. यात महाराष्ट्रातील केवळ दोन शहरांचा म्हणजेच मुंबई आणि पुण्याचा समावेश करण्यात आला आहे. पुण्यात एकूण पाच सामने खेळवले जाणार आहेत. परंतु नागपुरात एकाही सामन्याचं आयोजन केलेले नाही. नागपूर हे भारताचं मध्यवर्ती ठिकाण आहे. या ठिकाणी अद्ययावत सुविधा आहेत. नागपूरचं स्टेडियमही खूप सुंदर आहे. नागपुरात सामना असेल तर विदर्भाव्यतिरिक्त मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणातले लोक सामने पाहायला येतात.
अनिल देशमुख म्हणाले सर्व सोयी सुविधा असताना, उत्तम स्टेडियम असताना नागपूरला डावलण्यात आलं आहे ही दुःखाची गोष्ट आहे. त्यामुळे बीसीसीआयकडे आमची सर्व विदर्भवासियांची विनंती आहे की, त्यांनी याबद्दल फेरविचार करावा. जे सामने पुण्यात खेळवले जाणार आहेत त्यातले काही सामने कमी करून ते नागपूरच्या मैदानावर खेळवण्यात यावेत. असं केल्यास इथल्या जनतेला आनंद होईल.
हे ही वाचा >> IRE vs UAE: ही कसली खिलाडूवृत्ती? फलंदाज वेदनेने विव्हळत असताना क्षेत्ररक्षकाने अचानक केले धावबाद, VIDEO व्हायरल
अनिल देशमुख म्हणाले, पुण्यातल्या स्टेडियमवर जितक्या सुविधा आहेत तेवढ्याच किंवा त्यापेक्षा जास्त सुविधा नागपुरात आहेत. तसेच इथल्या स्टेडियममधील प्रेक्षकांची क्षमता जास्त आहे. हे नवीन स्टेडियम आहे. त्यामुळे बीसीसीआयने त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि काही सामने नागपूरला खेळवण्यात यावेत. यासाठी मी बीसीसीआयला पत्र लिहून विनंती करणार आहे. देशमुख टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.