पीटीआय, दुबई

मैदानाबाहेर सर्वाधिक चर्चा असलेला भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील आशिया चषक स्पर्धेतील सामना आज दुबईत होईल. ‘आयसीसी’च्या स्पर्धांचा इतिहास लक्षात घेतला, तर भारताचे पारडे कायमच जड राहिले आहे. अर्थात, ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील अस्थिरता लक्षात घेता या सामन्यातील रंगत नेहमीसारखीच राहणार आहे.

पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरचे ‘ऑपरेशन सिंदूर’ यामुळे मोठ्या प्रमाणावर भारताने पाकिस्तानशी खेळावे की नाही हाच मुद्दा सामन्याच्या चोवीस तासांपूर्वीदेखील केवळ चर्चिला जात आहे. मैदानाबाहेर जेवढी या सामन्याबद्दलची हवा आणि तीव्रता आहे, त्यापेक्षा अधिक तीव्रता प्रत्यक्ष मैदानात राहणार यात शंका नाही. फरक इतकाच असेल, की यावेळी स्टेडियममध्ये प्रेक्षकांमध्ये रंगणारा घोषणाबाजीचा दुसरा सामना दिसणार नाही. मैदानाबाहेरच्या तणावामुळे अद्याप या सामन्याची अनेक तिकिटे शिल्लक राहिली आहेत. नेहमीच हाऊसफुल्ल असणारा भारत- पाकिस्तान यांच्यातील सामना प्रथमच प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत दिसून येणार आहे. थोडक्यात काय तर खेळाडूंमध्ये खेळण्याचा उत्साह असला, तरी सामन्याभोवती आजपर्यंत असलेले वलय आणि तो उत्साह यावेळी दिसून येणार नाही. त्याच वेळी मैदाबाहेरील वातावरणामुळे मैदानावर दोन्ही संघांतील खेळाडूंनादेखील संयम दाखवावा लागणार आहे.

समाजमाध्यमावरून भारताने सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळत असल्यामुळे भारतातूनही किती दर्शक आणि अगदी ‘बीसीसीआय’चे किती पदाधिकारी उपस्थित राहतील याबाबतही निश्चिती नाही. सरकारच्या भूमिकेनुसार हा सामना होणार याशिवाय कोणीही या सामन्याविषयी अतिरिक्त भाष्य करण्यास तयार नाही.

उच्च गुणवत्तेचा अभाव

मैदानाबाहेरील परिस्थितीचा सामन्यावर काही परिणाम होणार नसला तरी प्रथमच या दोन पारंपरिक संघांमधील सामन्यात उच्च गुणवत्तेचा अभाव दिसून येत आहे. अर्थात, ही अडचण पाकिस्तानच्या बाजूने आहे. भारताविरुद्ध खेळण्याचे मानसिक दडपण आणि दुसरीकडे बाबर आझम तसेच, मोहम्मद रिझवानला वगळल्याप्रकरणी सुरू असलेली चौकशी अशा कात्रीत पाकिस्तान संघ सापडला आहे. नवा कर्णधार सलमान अली आघा याला अशा कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, अभिषेक शर्मा, जसप्रीत बुमरा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती ही भारतीय संघातील नावे पाकिस्तानी संघात धडकी भरवण्यास पुरेशी आहेत. अर्थात, क्रिकेटमध्ये कायमच अनिश्चितता दिसून आली आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेट तर सर्वात अस्थिर मानले जाते. एखादे षटक आणि एखाद्या फलंदाजाची खेळी सामन्याचा निर्णय कुठल्याही क्षणी बदलू शकते. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ एकमेकांना निश्चित गृहीत धरणार नाहीत. पाकिस्तान संघातील सर्वात प्रतिभावान खेळाडूंमध्ये सलामीचा फलंदाज सैम अयुब, मधल्या फळीत हसन नवाझ आणि अबरार अहमद, सुफियान मुकीन, मोहम्मद नवाज हे नवोदित फिरकी गोलंदाज बाबर आणि रिझवानच्या गैरहजेरीत पाकिस्तानला सिद्ध करण्याची क्षमता राखून आहेत.

फिरकी गोलंदाजांची कसोटी

शाहीन शाह आफ्रिदी हा वेगवान गोलंदाज पाकिस्तान संघात असला, तरी सततच्या दुखापतीनंतर त्याच्यामध्ये सुरुवातीची दाहकता राहिलेली नाही. खेळपट्टीवर चेंडू फारसा वळत नसला, तरी दोन्ही संघांच्या फिरकी गोलंदाजांची कसोटी लागणार आहे. सुफियान मुकिम, अबरार अहमद ही फिरकी जोडी पाकिस्तानसाठी सज्ज असेल. पण भारताचा मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती हे भारतीय फिरकी गोलंदाज पाकिस्तानच्या फलंदाजांच्या मनावर विरजण टाकू शकतात. पाकिस्तान संघातील एकही फलंदाज अद्याप या फिरकी गोलंदाजांना सामोरा गेलेला नाही. त्यामुळे बुमरापाठोपाठ पाकिस्तानला भारताच्या फिरकीला तोंड देण्याचे आणखी एक आव्हान पार करावे लागणार आहे.

आशिया चषकात भारत-पाकिस्तान 

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० सामने धरुन दोन्ही देशांत आतापर्यंत १९ सामने झाले असून भारताने १०, तर पाकिस्तानने सहा विजय मिळविले आहेत. तीन सामन्यांचा निकाल लागला नाही. ट्वेन्टी-२० मध्ये चार सामन्यांत भारताचे तीन, तर पाकिस्तानचा एक विजय.

भारताची सरस फलंदाजी

गोलंदाजीच्या आघाडीवर भारताची बाजू अलीकडच्या काळात अधिक भेदक वाटत असली, तरी फलंदाजांनाही विसरता येणार नाही.

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन हे पाच फलंदाज क्रिकेट विश्वातील कुठल्याही गोलंदाजीवर तुटून पडू शकतात.

त्यामुळे अननुभवी पाकिस्तानी गोलंदाजांना भारतीय फलंदाजीवर अंकुश ठेवणे देखील शिवधनुष्य पेलण्याइतके कठीण जाणार आहे.

हे पाच फलंदाज कमी पडले, तर पुढे हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल हे फलंदाज देखील गोलंदाजांची त्रेधा उडविण्याची क्षमता राखून आहेत.

साहजिकच भारताला संघ निवडताना गोलंदाज आणि फलंदाज यांच्यामध्ये योग्य सांगड घालावी लागणार आहे. पाकिस्तानकडे सध्या तरी सैम अयुब वगळता भरवशाचा दुसरा फलंदाज सापडणे कठीण आहे.

संघ

भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), शिवम दुबे, अक्षर पटेल, जसप्रीत बुमरा, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंह.