Suryakumar Yadav likely to miss Mumbai Indians’ opening match : आयपीएलचा सतरावा हंगाम २२ मार्चपासून सुरू होणार आहे. सलामीचा सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) यांच्यात होणार आहे. दुसऱ्याच दिवशी गुजरात टायटन्ससमोर पाच वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचे आव्हान असेल. उभय संघांमधील हा सामना अहमदाबाद येथे होणार आहे. आयपीएल सुरू होण्याआधीच मुंबई संघाला मोठा झटका बसला आहे. त्यांचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव पहिल्या काही सामन्यांमध्ये खेळण्याबाबत साशंकता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दक्षिण आफ्रिकेत सूर्याला झाली होती दुखापत –

गेल्या वर्षाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान सूर्यकुमारला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रियाही करावी लागली. यानंतर तो पुनरागमन करू शकला नाही. सूर्या आयपीएलमधील संघाच्या पहिल्या सामन्यात खेळेल, असे मानले जात होते, परंतु आता यावरही संकटाचे ढग दाटून आले आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार तो संघाच्या पहिल्या दोन सामन्यात खेळू शकणार नाही.

सूर्याचे रिहॅबिलिटेशन सुरु –

शस्त्रक्रियेनंतर सूर्याचे सध्या बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) रिहॅबिलिटेशन सुरू आहे. मुंबईच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी तो उपलब्ध असेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. २३ मार्चला गुजरातविरुद्धच्या सामन्यानंतर मुंबईचा संघ २७ तारखेला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. हा सामना हैदराबादमध्ये होणार आहे.

हेही वाचा – World Cup 2024 : टीम इंडियाला मोठा धक्का! ‘हा’ स्टार खेळाडू टी-२० विश्वचषकातून झाला बाहेर

सूर्यकुमार आयपीएलमध्येच पुनरागमन करणार –

बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, “सूर्याचे रिहॅबिलिटेशन चांगल्या प्रकारे सुरू आहे. तो निश्चितपणे आयपीएलमध्येच पुनरागमन करेल. तथापि, एनसीएचे क्रीडा विज्ञान आणि वैद्यकीय संघ त्याला गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळण्यास परवानगी देईल की नाही हे अद्याप स्पष्ट नाही.”

हेही वाचा – IPL : कोहली-आरसीबी ऋणानुबंधाची १६ वर्ष, शेअर केला VIDEO

सूर्या इन्स्टाग्रामवर फिटनेसचे अपडेट्स देत असतो –

जर आपण सूर्यकुमारच्या इन्स्टाग्राम हँडलवर नजर टाकली, तर तो खूप ताकद आणि कंडिशनिंग रूटीन करताना दिसतो. त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तो याबाबत अपडेट्स देत असतो. बोर्डाच्या सूत्राने पुढे सांगितले की, ‘मुंबई इंडियन्सकडे त्यांचा पहिला सामना खेळण्यासाठी अजून १२ दिवस बाकी आहेत, परंतु सामन्यापूर्वी त्यांचा वेळ खूप वेगाने जात आहे.’

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci sources say suryakumar yadav likely to miss mumbai indians opening two matches of ipl 2024 vbm