Ben Stokes congratulated the Australian team : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर १९ नोव्हेंबर रोजी झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर ६ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना २४० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया संघाने ट्रॅव्हिस हेडने झळकवलेल्या शतकाच्या जोरावर २४१ धावा करत विजय मिळवला. या विजयांतर इंग्लंड क्रिकेट संघाचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ ची ट्रॉफी जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे अनोख्या पद्धतीने अभिनंदन केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकदिवसीय विश्वचषकातील इंग्लंडच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले, तर ही स्पर्धा गतविजेत्यासाठी वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हती. संघाने खेळलेल्या ९ पैकी केवळ ३ सामने जिंकले, तर ६ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्यात यशस्वी झाला आहे. आता या विजयाबद्दल बेन स्टोक्सने खास पद्धतीने ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन केले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर बेन स्टोक्सने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये बेन स्टोक्स म्हणाला, “हे टाईप करायला मला थोडा वेळ लागला. विश्वचषक जिंकल्याबद्दल पॅट कमिन्स आणि त्याच्या ऑस्ट्रेलिया संघाचे अभिनंदन, ८ आठवड्यांच्या कठीण कालावधीनंतर शेवटी ट्रॉफी जिंकण्यापेक्षा दुसरे काहीही खास नाही.”

सामन्याबद्दल बोलायचे तर, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच प्रथम फलंदाजी करायला उतरलेला भारतीय संघ ५० षटकांत २४० धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४३ षटकांत ४ विकेट गमावत २४१ धावा करत सामना जिंकला. कांगारू संघासाठी ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक १३७ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. मार्नस लाबुशेनने नाबाद ५८ धावा केल्या.

हेही वाचा – IND vs AUS Final: “अतिआत्मविश्वास तुम्हाला…”, टीम इंडियाच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचा ‘तो’ VIDEO व्हायरल

तत्पूर्वी, भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक ६६ आणि विराट कोहलीने ५४ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने ४७ आणि सूर्यकुमार यादवने १८ धावा केल्या. कुलदीप यादवने १० धावांचे योगदान दिले. या पाच खेळाडूंशिवाय इतर कोणीही दुहेरी आकडा गाठू शकला नाही. त्याचबरोबर भारताचे तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. या स्पर्धेत सलग १० सामने जिंकले होते, मात्र ११व्या सामन्यात संघ मागे पडला. भारताला दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाने शेवटचा पराभव २००३ मध्ये केला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ben stokes praised pat cummins and his team after australia won their sixth odi world cup 2023 vbm