Gujarat Giants Women vs Delhi Capitals Women : दिल्ली कॅपिटल्स विरोधात गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या गुजरातच्या ५ फलंदाजांना दिल्ली कॅपिटल्सची वेगवान गोलंदाज मारिझान कापने पव्हेलियनचा रस्ता दाखवला. सलामीला उतरलेल्या सबिनेनी मेघना आणि लॉरा वॉलवर्थला कापने स्वस्तात माघारी पाठवले. त्यामुळं गुजरातच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. गुजरातने ९ गडी गमावत २० षटकात १०५ धावांची मजल मारली. पण त्यानंतर १०६ धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी दिल्लीच्या धडाकेबाज सलामीवीर फलंदाज शफाली वर्मा आणि कर्णधार मेग लॅनिंग मैदानात उतरली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक ठोकणाऱ्या शिफाली वर्माने दिल्लीला विजयाच्या दिशेनं नेलं. फक्त २८ चेंडूत ७६ धावांची वादळी खेळी करुन शफाली वर्माने दिल्ली कॅपिटल्सला दणदणीत विजय मिळवून दिला. तर कर्णधार मेग लॅनिंगने १५ चेंडूत २१ धावा केल्या. शफालीने १० चौकार आणि ५ षटकार मारून चौफेर फटकेबाजी केली. त्यामुळे फक्त ७.१ षटकात १०७ धावा करून दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सचा दारूण पराभव केला.

नक्की वाचा – अहमदाबाद कसोटी सामना रद्द झाल्यास टीम इंडियाचं काय होणार? ‘असं’ असेल WTC फायनलचं संपूर्ण गणित

गुजरातसाठी मैदानात फलंदाजीला उतरलेल्या सलामीवीर सबिनेनी मेघनाला भोपळाही फोडता आला नाही. लॉरा वॉलवर्थने फक्त एक धाव केली. कारण मारिझान कापने या दोन्ही फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या. त्यानंतर हरलीन देओलने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. हरलीनने १४ चेंडूत २० धावा केल्यानंतर पुन्हा एकदा मारिझानने हरलीनला पायचीत करत पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर शिखा पांडेच्या गोलंदाजीवर दयालन हेमलता ५ धावांवर असताना बाद झाली. त्यानंतर कापच्या शेवटच्या षटकात सुष्मा वर्माची दांडी गुल झाली. सुष्माने १० चेंडूत फक्त २ धावा केल्या. जॉर्जिया वॅरेहमने २५ चेंडूत २२ धावा केल्या. दिल्लीच्या राधा यादवने जॉर्जीयाला क्लीन बोल्ड केलं. तसंच गुजरातची कर्णधार स्नेह राणा शिखा पांडेच्या गोलंदाजीवर बाद झाली.

या महिला प्रीमियर लीगमध्ये गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स पहिल्यांदाच आमनेसामने उतरले आहेत. दिल्लीने यापू्र्वी झालेल्या तीन सामन्यांपैकी २ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. पण गुजरातला तीन सामन्यांमध्ये फक्त एकाच सामन्यात विजय संपादन करता आलं आहे. त्यामुळे गुणतालिकेत वरचा टप्पा गाठण्यासाठी गुजरातच्या संघाला सामना जिंकण्याची गरज आहे. दिल्लीचा मागील सामन्यात मुंबई इंडियन्सने पराभव केला होता. त्यामुळे दिल्ली ४ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi capitals women wins against gujrat giants women shafali verma sets fastest fifty in 19 balls wpl 2023 match update nss