Dinesh Karthik apologises for MS Dhoni snub from all-time XI : माजी यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने अलीकडेच त्याच्या आवडत्या ‘ऑल टाइम इंडिया प्लेइंग इलेव्हन’ची निवड केली. ज्यामध्ये कार्तिकने सध्याच्या पाच क्रिकेटपटूंना संघात निवडले होते, पण त्यात माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीचा समावेश केला नव्हता. अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज धोनीला ‘ऑल टाईम इंडिया इलेव्हन’मधून वगळण्यात आल्याने क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आणि त्यांनी कार्तिकवर जोरदार टीका केली. मात्र, ३९ वर्षीय कार्तिकने आता आपली चूक सुधारली असून धोनीची निवड न केल्याबद्दल चाहत्यांची माफी मागितली आहे.

‘भावांनो मोठी चूक झाली’ –

क्रिकबझवर युजर्सच्या प्रश्नांची उत्तरे देताना कार्तिकने आपली चूक मान्य केली. तो म्हणाला, “भावांनो, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. ती खरोखरच एक चूक होती. व्हिडिओ समोर आल्यानंतर मला याची जाणीव झाली. जेव्हा मी ही इलेव्हन निवडली तेव्हा खूप गोष्टी घडत होत्या. मी यष्टीरक्षकाला (धोनी) विसरलो. सुदैवाने, राहुल द्रविड इलेव्हनचा भाग होता म्हणून प्रत्येकाला वाटले की मी अर्धवेळ विकेटकीपर ठेवला आहे, पण मी राहुल द्रविडचा यष्टीरक्षक म्हणून विचार केला नाही. धोनी निश्चितच इलेव्हनचा भाग आहे आणि कर्णधारपदही त्याच्याकडेच राहील,” असे तो म्हणाला.

‘थाला धोनी सातव्या क्रमांकावर असेल’ –

दिनेश कार्तिर पुढे म्हणाला, “जर मी पुन्हा ‘ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन’ निवडली, तर मी एक बदल नक्कीच करेन. थाला धोनी सातव्या क्रमांकावर असेल आणि तो कोणत्याही भारतीय संघाचा कर्णधार असेल. यात शंका नाही.” कार्तिकने आपल्या ऑल टाइम इंडिया इलेव्हनमध्ये सलामीवीर म्हणून रोहित शर्मा आणि वीरेंद्र सेहवागची निवड केली होती. त्याने राहुल द्रविडला तिसऱ्या स्थानावर आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकरला चौथ्या स्थानावर ठेवले.

हेही वाचा – Australia U19 Women’s Squad: भारतीय वंशाच्या लेकी कांगारू संघात, पाहा कोण आहेत या खेळाडू?

त्याच्यानंतर विराट कोहली, युवराज सिंग आणि रवींद्र जडेजा यांची अष्टपैलू म्हणून निवड केली. यानंतर दोन फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि अनिल कुंबळे आणि दोन वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि झहीर खान या खेळाडूंचा आपल्या ऑल टाइम इंडिया इलेव्हनमध्ये समावेश केला.

हेही वाचा – Cristiano Ronaldo: फुटबॉलनंतर आता युट्युबवरही रोनाल्डोचा खास विक्रम, अवघ्या ९० मिनिटांत मिळवलं गोल्डन बटण

दिनेश कार्तिकची ऑल टाइम इंडिया प्लेइंग इलेव्हन :

वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, युवराज सिंग, रवींद्र जडेजा, अनिल कुंबळे, आर अश्विन, झहीर खान, जसप्रीत बुमराह.