India vs England 2nd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना एजबस्टनच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात यजमान इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं आहे. भारताचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. नाणेफेकीच्या वेळी कर्णधार शुबमन गिलने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्याने या सामन्यासाठी जसप्रीत बुमराहला प्लेइंग ११ मधून बाहेर ठेवल्याची माहिती दिली. या निर्णयानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक नवज्योतसिंग सिद्धू यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय संघाला मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे भारतीय संघाला या मालिकेत पुनरागमन करायचं असेल, तर हा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं असणार आहे. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला पूर्ण जोर लावावा लागणार आहे. मात्र, या सामन्यात भारतीय संघाने प्लेइंग ११ मध्ये ३ मोठे बदल केले आहेत. जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर आणि साई सुदर्शनला प्लेइंग ११ मधून बाहेर ठेवून नितीश कुमार रेड्डी, आकाश दीप आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आला आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांच्या मते, या सामन्यात जसप्रीत बुमराहला संधी द्यायला हवी होती.
काय म्हणाले नवज्योतसिंग सिद्धू?
नवज्योतसिंग सिद्धू हे स्टार स्पोर्ट्सच्या समालोचन पॅनेलमध्ये आहेत. समालोचन करताना ते म्हणाले, “भारतीय संघाने आपलं ब्रम्हास्त्र बाहेर ठेवलं आहे. गिलने जसं सांगितलं की, तिसरा सामना लॉर्ड्सच्या मैदानावर आहे. त्या मैदानावर बुमराहची गरज भासेल. पण हा सामना गमावला तर तिसऱ्या सामन्यात खेळवून काय फायदा? कारण २-० ने पिछाडीवर असताना पुनरागमन करणं सोपं नसतं.”
बुमराहला वर्कलोड मॅनेज करण्यासाठी या सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले,”तुम्ही बुमराहला वर्कलोड मॅनेज करण्यासाठी प्लेइंग ११ मधून बाहेर ठेवलं आहे. पण पहिल्या सामन्यानंतर ८ दिवस विश्रांती केली ना. बुमराहला बाहेर ठेवायला नको होतं.”
कर्णधार शुबमन गिल काय म्हणाला?
“आम्हालाही नाणेफेक जिंकून गोलंदाजी करायची होती. या सामन्यासाठी प्लेइंग ११ मध्ये ३ बदल करण्यात आले आहेत. रेड्डी, वॉशिंग्टन आणि आकाश दीपला प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आला आहे. बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. त्याचा कामाचा ताण सांभाळण्यासाठी (वर्कलोड ) त्याला विश्रांती देण्यात आली आहे. तिसरा सामना लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या मैदानावर गोलंदाजांना चांगली मदत मिळते. या सामन्यात बुमराह खेळताना दिसेल.”