Navjyot Singh Sidhu reaction on Virat Kohli’s form : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये भारतीय संघाची कामगिरी आतापर्यंत चांगली राहिली असून त्यांनी सर्व सामने जिंकले आहेत. ग्रुप स्टेजमध्ये भारताने आधी आयर्लंडचा पराभव केला आणि त्यानंतर टीमने पाकिस्तानचाही दणदणीत पराभव केला. भारताने अमेरिकेविरुद्धही विजय मिळवला होता, मात्र कॅनडाविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. यानंतर सुपर ८ फेरीतील सामन्यातही भारतीय संघाने शानदार विजय मिळवला. भारतीय संघ विजय रथावर स्वार असला, तरी संघाला स्टार फलंदाज विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल चिंता सतावत आहे. आता माजी खेळाडू नवज्योत सिंग सिद्धूने विराट कोहलीबद्दल महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

सुपर ८ मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा ४७ धावांनी पराभव केला. या सामन्यानंतर भारताचा माजी खेळाडू नवज्योत सिंग सिद्धूने विराट कोहलीबाबत आपले मत मांडले आहे. या स्पर्धेत विराट कोहलीची आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक आहे. त्याने चार डावात केवळ २९ धावा केल्या आहेत.अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने २४ चेंडूत २४ धावांची खेळी केली. या स्पर्धेत भारतीय संघाच्या सलामीची जबाबदारी विराट कोहलीवर सोपवण्यात आली आहे पण अनुभवी फलंदाज ही कामगिरी चोख बजावण्यात अपयशी ठरला आहे.

मात्र, आता नवज्योतसिंग सिद्धूने विराट कोहलीचे भरभरून कौतुक केले आहे. तसेच त्याने उर्वरित सामन्यांमध्ये इतर संघांनाही कडक इशारा दिला आहे. नवज्योत सिंग सिद्धूने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये विराट कोहली मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहे आणि त्याला जास्त काळ शांत ठेवता येणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – T20 WC 2024 : पंतची गिलख्रिस्टशी तुलना करण्यावर माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘त्याच्यासारखा बनण्यासाठी पंतला अजून…’

नवज्योत सिंग सिद्धू विराट कोहलीबद्दल काय म्हणाला?

नवज्योत सिंग सिद्धूने म्हणाला, “एखाद्या शक्तीशाली व्यक्तीने आपली शक्ती दाखवली नाही, तर ती व्यक्ती दुखावली जाते आणि दुखावलीही पाहिजे. कारण प्रत्येक व्यक्ती अपयशातूनच शिकतो. मला वाटते की विराट कोहली मानसिकदृष्ट्या इतका मजबूत आहे की तो सरावाच्या माध्यमातून त्याच्या चुकांमधून शिकू शकतो. त्यामुळे विराट कोहली पण अगोदरच्या चुका आता पुन्हा करणार नाही.”