भारतीय संघाने चौथ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४८ धावांनी विजय मिळवला. भारताच्या गोलंदाजांनी सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. टीम इंडियाच्या प्रत्येक गोलंदाजाने सामन्यात विकेट घेत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर टाकलं. यासह भारतीय संघाने मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली आहे.
भारताने दिलेल्या १६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरूवात चांगली झाली. पण अक्षर पटेलच्या विकेट्समुळे भारताने पुनरागमन केलं. मॅथ्यू शॉर्टला २५ धावांवर अक्षर पटेलने पायचीत केलं. तर कर्णधार मिचेल मार्श ३० धावा करत बाद झाला. यानंतर जोश इंग्लिस १२ धावा, टीम डेव्हिड १४ धावा, जोश फिलिपी १० धावा आणि मार्कस स्टॉयनिस १७ धावा करत बाद झाले. तर मॅक्सवेल २ धावा, द्वारशुईस ४ धावा, बार्टलेट शून्यावर बाद झाले. भारताच्या गोलंदाजांनी तर सामन्यात कहर केला.
भारताकडून या सामन्यात अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर व शिवम दुबे यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. तर अर्शदीप सिंग व वरूणने १-१ विकेट घेतल्या. तर वॉशिंग्टन सुंदरने ८ चेंडूत ३ विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराहने १ विकेट घेतली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या टी-२० सामन्याची नाणेफेक ऑस्ट्रेलियाने जिंकली आणि भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. अभिषेक शर्मा व शुबमन गिल यांनी भारताला चांगली सुरूवात करून देण्याचा प्रयत्न केला. पण अभिषेक शर्मा चांगल्या सुरूवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. अभिषेक शर्मा २१ चेंडूत ३ चौकार व एका षटकारासह २८ धावा करत बाद झाला. तर शुबमन गिलने ३९ चेंडूत ४६ धावांची खेळी करत बाद झाला. शिवम दुबे या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर उतरला होता आणि त्याने २२ धावांची खेळी केली. या दोघांनाही नॅथन एलिसने क्लीन बोल्ड केलं. यानंतर सूर्यकुमार यादवने १० चेंडूत दणदणीत २० धावांची खेळी केली, पण तो मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला.
यानंतर तिलक, जितेश ५ आणि ३ धावा करत बाद झाले. तर वॉशिंग्टनही १२ धावा करून माघारी परतला. अक्षर पटेलने या सामन्यात २१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, ज्यामुळे संघ ८ बाद १६७ धावा करण्यात यशस्वी ठरला. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिस व झाम्पाने प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. तर बार्टलेट व स्टॉयनिस यांनी १-१ विकेट घेतल्या.
