India vs Australia 4th T20 Playing 11: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा सामना आज रायपूरमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल, तर नाणेफेक त्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच संध्याकाळी ६.३० वाजता होईल. टीम इंडिया मालिकेत २-१ने आघाडीवर असेल, पण ऑस्ट्रेलियाने मंगळवारी ज्या प्रकारे पुनरागमन केले, त्यामुळे ही मालिका रोमांचक झाली आहे. ऑस्ट्रेलिया संघाला कधीही कमी लेखता येणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑस्ट्रेलियाने नेहमीच दाखवून दिले आहे की, ते विरोधी संघाच्या छोट्या चुका हेरून त्यावर विजय मिळवू शकतात. विश्वचषकात दोन सामने पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलियन संघाला लोक दुबळे समजत होते, पण हा संघ विश्वविजेता आहे. टीम इंडियाला अशा प्रकारची चूक टाळावी लागेल. जर भारताने आजचा सामना जिंकला तर टीम इंडिया या मालिकेत अभेद्य आघाडी घेईल.

भारतीय संघात अनेक बदल होऊ शकतात

या सामन्यासाठी भारतीय प्लेइंग-११ मध्ये अनेक बदल पाहायला मिळू शकतात. पहिल्या तीन सामन्यांमध्ये ऋतुराज गायकवाड सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात उपकर्णधाराची भूमिका बजावत होता. मात्र, आता शेवटच्या दोन सामन्यांसाठी श्रेयस अय्यरचे पुनरागमन झाले असून तो उपकर्णधाराची भूमिका बजावणार आहे. त्याच्या पुनरागमनामुळे टीम इंडिया मजबूत झाली आहे. वर्ल्ड कपमध्ये श्रेयस जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. मात्र, त्याच्या येण्याने कोण बाहेर जाणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

ऋतुराजने गेल्या सामन्यात शतक झळकावले होते, तर यशस्वीने या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये विस्फोटक अर्धशतकी खेळी केली होती. अशा स्थितीत दोघेही सलामीला येणार हे निश्चित आहे. इशान किशन हा एकमेव यष्टिरक्षक तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचवेळी सूर्यकुमार चौथ्या क्रमांकावर खेळण्याची शक्यता आहे. तिलक वर्माच्या जागी श्रेयसला संधी मिळू शकते. या मालिकेत तिलकने म्हणवी तशी खास कामगिरी केली नाही. रिंकू सिंग आपली मॅच फिनिशरची भूमिका उत्तमपणे बजावत आहे आणि त्याला हटवणे कठीण आहे. अशा परिस्थितीत श्रेयसच्या जागी फक्त तिलक वर्माच संघाबाहेर जाऊ शकतो.

दीपकला गोलंदाजीत संधी मिळू शकते

गोलंदाजीतही टीम इंडियामध्ये अनेक बदल पाहायला मिळतील. या मालिकेत अर्शदीप सिंग आणि प्रसिध कृष्णाचा फॉर्म काही खास राहिला नाही. गेल्या सामन्यात प्रसिधने शेवटच्या षटकात २३ धावांसह एकूण ६८ धावा दिल्या होत्या. अशा परिस्थितीत ते बाहेर जाऊ शकतो. मुकेश कुमार लग्नानंतर परतला आहे तसेच, दीपक चाहरलाही संघात सामील करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत अर्शदीप सिंगच्या जागी दीपक चाहर आणि प्रसीधच्या जागी मुकेशचा प्रवेश होऊ शकतो. याशिवाय अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई खेळणार हे निश्चित मानले जात आहे.

हेही वाचा: World Cup: विश्वचषक ट्रॉफीवर पाय ठेवून बसलेल्या मिचेल मार्शचे बेताल वक्तव्य; म्हणाला, “मी पुन्हा तसेच…”

ऑस्ट्रेलियन संघातही बरेच बदल होऊ शकतात

ऑस्ट्रेलियाबद्दल जर बोलायचे झाले तर तिसर्‍या टी-२०पूर्वी संघात अनेक बदल करण्यात आले होते. जिथे तिसर्‍या सामन्यापूर्वी स्टीव्ह स्मिथ आणि अ‍ॅडम झाम्पा देशात परतले. त्याच वेळी, तिसरा सामना संपल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, जोश इंग्लिस आणि शॉन अ‍ॅबॉट देखील आपल्या देशात परतले. त्यांच्या जागी बेन मॅकडरमॉट, जोश फिलिप, बेन ड्वार्शियस आणि ख्रिस ग्रीन यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियासाठी या मालिकेत मॅक्सवेल आणि इंग्लिस या दोन खेळाडूंनी शतके झळकावली असून दोघेही परतले आहेत.

तिसर्‍या टी-२० मध्ये मॅक्सवेल विजयाचा शिल्पकार होता. अशा परिस्थितीत या दिग्गजांच्या जाण्याने जरी कांगारू संघ थोडा दुबळा झाला असला तरी या संघाला कमी लेखता येणार नाही. ज्यांचा समावेश करण्यात आला आहे ते टी-२० लीगमधील मजबूत खेळाडू आहेत आणि त्यांनी बिग बॅशमध्ये स्वत:ला सिद्ध केले आहे. अशा स्थितीत दोन युवा संघांमध्ये रंजक स्पर्धा पाहायला मिळू शकते.

हेही वाचा: IND vs SA: टी-२० विश्वचषकात रोहित कर्णधार होणार? स्पर्धेपूर्वी भारत खेळणार आठ सामने; आयपीएलनंतर BCCI घेणार निर्णय

दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-११

भारत: यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), श्रेयस अय्यर/तिलक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग/दीपक चाहर, प्रसिध कृष्णा/आवेश खान, मुकेश कुमार.

ऑस्ट्रेलिया: अ‍ॅरॉन हार्डी, ट्रॅविस हेड, मॅथ्यू शॉर्ट, बेन मॅकडरमॉट, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (कर्णधार/ यष्टीरक्षक), ख्रिस ग्रीन, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus 4th 11 will shreyas iyer deepak chahar gets a chance the playing 11 of both the teams could be like this avw