IND vs BAN 1st Test Ravichandran Ashwin scored a century against Bangladesh : रविचंद्रन अश्विनने भारतासाठी दमदार कामगिरी करत बांगलादेशविरुद्ध चेन्नई कसोटीत शतक झळकावले. अश्विनने अप्रतिम खेळी केली. त्याने रवींद्र जडेजासोबत १९५ धावांची भागीदारीही पूर्ण केली आहे. टीम इंडियाची सुरुवात खराब होती झाली. मात्र, यानंतर जडेजा आणि अश्विनने डावाची धुरा सांभाळली. अश्विनने अवघ्या १०८ चेडूंत शतक झळकावत भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली. त्यामुळे भारताने बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ८० षटकानंतर ६ बाद ३३९ धावांपर्यंत मजल मारली आहे.

अश्विनचे कसोटी कारकीर्दीतील सहावे शतक –

बांगलादेशने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी अश्विन भारताकडून आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला, तर जडेजा सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. अश्विनने दमदार फटकेबाजी करत कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. महत्त्वाची बाब म्हणजे हा सामना पाहण्यासाठी त्याचे वडीलही चेपॉक स्टेडियमवर आले आहेत. अश्विनने १०८ चेंडूंचा सामना करत शतक पूर्ण केले. ज्यामध्ये त्याने १० चौकार आणि २ षटकार मारले. तो आता १०२ आणि रवींद्र जडेजा ८६ धावांवर नाबाद परतले आहे.

अश्विन-जडेजाची सातव्या विकेटसाठी विक्रमी १९५ धावांची भागीदारी –

भारताचे स्टार फलंदाज धावा काढण्यासाठी धडपडताना दिसत होते, तर जडेजा आणि अश्विनने उत्कृष्ट खेळी खेळून भारताला संकटातून बाहेर काढले. या दोघांनी आता भारताला मजबूत स्थितीत पोहोचवले आहे. या काळात अश्विनने कसोटी कारकिर्दीतील सहावे शतकही पूर्ण केले. तसेच रवींद्र जडेजाने ११७ चेंडूत १० चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ५६ धावांवर नाबाद आहे. या दोघांनी चांगली फलंदाजी करत सातव्या विकेटसाठी नाबाद १९५ धावांची भागीदारी करत २४ वर्ष जुना विक्रमही मोडीत काढला. बांगलादेशकडून महमूदने तीन विकेट्स तर नाहिद राणा आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली.

बांगलादेशविरुद्ध सातव्या विकेट्ससाठी भारतीय खेळांडूनी केलेल्या सर्वाधिक धावा-

१९५* धावा – रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा – चेन्नई २०२४
१२१ धावा – सौरव गांगुली आणि सुनील जोशी – ढाका २०००
११८ धावा – रवींद्र जडेजा आणि वृद्धीमान साहा – हैदराबाद २०१७

हेही वाचा – IND vs BAN : रविचंद्रन अश्विनचे विक्रमी सहावे कसोटी शतक, बांगलादेशी गोलंदाजांची उडवली झोप

यशस्वी जैस्वालचेही अर्धशतक –

तत्पूर्वी, यशस्वी जैस्वाल वगळता भारताची टॉप ऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरली. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली प्रत्येकी सहा धावा करुन बाद झाले. त्याचबरोबर शुबमन गिलला खातेही उघडता आले नाही. यानंतर प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत ३९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. केएल राहुल देखील पहिल्या डावात छाप पाडू शकला नाही आणि १६ धावा करून सहावा फलंदाज म्हणून बाद झाला. मात्र, अश्विन आणि जडेजाशिवाय सलामीवीर यशस्वी जैस्वालनेही आपली ताकद दाखवत ११८ चेंडूत नऊ चौकारांच्या मदतीने ५६ धावा केल्या.