IND vs ENG Tom Banton called up as cover for the 3rd ODI against India : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पूर्वी भारत आणि इंग्लंडमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ४ विकेट्सने विजय मिळवला होता. यानंतर दोन्ही संघांतील दुसरा एकदिवसीय सामना कटक येथे खेळला जात असताना इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने एक मोठा निर्णय घेतला. पहिल्या सामन्यातील दुखापतग्रस्त खेळाडू जेकब बेथेलच्या जागी टॉम बँटनचा संघात समावेश केला आहे. त्याला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातील प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिल्या सामन्यात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू जेकब बेथेल जखमी झाला. त्याच्या डाव्या पायाच्या स्नायूला दुखापत झाली होती. या सामन्यात त्याने इंग्लंडसाठी अर्धशतक झळकावले आणि एक विकेटही घेतली होती. बेथेलच्या दुखापतीमुळे इंग्लंडच्या अडचणी वाढल्या होत्या. या कारणास्तव, मालिकेच्या मध्यभागी, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने एक मोठा निर्णय घेतला आणि २६ वर्षीय विकेटकीपर फलंदाज टॉम बँटनला त्याच्या जागी संघात सामील केले आहे.

टॉम बँटनने खेळलेत ६ एकदिवसीय सामने –

रविवारी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये असे म्हटले आहे की, सोमवारी अहमदाबादमध्ये पोहोचल्यानंतर जेकब बेथेलच्या दुखापतीचे (बुधवारी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी) अधिक मूल्यांकन केले जाईल. आता टॉम बँटनला त्याचा बदली खेळाडू म्हणून बोलावण्यात आले आहे. त्याने सहा एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि त्यात त्याने १३४ धावा केल्या आहेत. या काळात त्याची सर्वोच्च धावसंख्या ५८ धावा होती.

टॉम बँटन उत्तम फॉर्ममध्ये –

टॉम बँटन गेल्या काही काळापासून उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याने टी-२० फ्रँचायझी क्रिकेटमध्ये खूप धावा केल्या आहेत. तो सध्या यूएई आयएल टी-२० स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे, जिथे त्याने ११ डावांमध्ये ५४.७७ च्या सरासरीने ४९३ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये दोन शतकांचा समावेश आहे. त्याने इंग्लंडकडून शेवटचा एकदिवसीय सामना ऑगस्ट २०२० मध्ये खेळला होता.

बँटन सोमवारी भारतात पोहोचेल –

टॉम बँटन सोमवारी भारतात पोहोचेल. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारत १-० ने आघाडीवर आहे. इंग्लंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यांसाठी त्यांच्या संघात तीन बदल केले, जखमी बेथेल, ब्रायडन कार्स आणि जोफ्रा आर्चर यांच्या जागी मार्क वूड, गस अ‍ॅटकिन्सन आणि जेमी ओव्हरटन यांना संधी दिली. टीम इंडियाने पहिला सामना शानदार पद्धतीने जिंकला होता. यानंतर, दोन्ही संघांमधील दुसरा सामना कटकच्या स्टेडियममध्ये होत आहे. तिसरा सामना १२ फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या मैदानावर खेळवला जाईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng ecb tom banton called up as cover of injured jacob bethell for the 3rd odi against india vbm