India vs Pakistan, Asia Cup 2025 Final: आशिया चषक २०२५ स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने सर्व सामने जिंकून थाटात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध होणार आहे. ४१ वर्ष आणि १७ हंगाम उलटल्यानंतर भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आशिया चषकातील अंतिम फेरीत खेळताना दिसणार आहे. त्यामुळे जो संघ जिंकेल, त्या संघाकडे इतिहासाला गवसणी घालण्याची संधी असणार आहे. पण पहिल्यांदाच भारतीय संघ विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांसारख्या दिग्गज खेळाडूंशिवाय ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

विराट कोहली, रोहित शर्मा, आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर भारतीय संघाचं काय होणार? असा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना भारताच्या खेळाडूंनी आरसा दाखवला आहे. भारतीय क्रिकेट कोणासाठीच थांबत नसतं आणि एक गेला की खेळाडू येतो आणि भारताचा स्टार होतो, हे पुन्हा सिद्ध झालं आहे. या दिग्गज खेळाडूंची जागा भरून काढणं सोपं नाही, पण भारताच्या युवा खेळाडूंनी या खेळाडूंचा वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम केलं आहे.

जून २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने इतिहासाला गवसणी घातली. अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत दुसऱ्यांदा आयसीसी टी-२० वर्ल्डकप ट्रॉफीवर कब्जा केला होता. ही स्पर्धा झाल्यानंतर विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा या तिन्ही खेळाडूंनी टी-२० आंतरराष्ट्रीय निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर २०२५ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही भारताने विजय मिळवला.

या स्पर्धेतही हे तिघे भारतीय संघाचा भाग होते. २००७ नंतर आतापर्यंत जितक्या वेळेस भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, त्या सामन्यांमध्ये या तिघांपैकी एक तरी खेळाडू भारतीय संघाचा भाग होता. मात्र विराट, रोहितने कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. तर रवींद्र जडेजाने केवळ टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे हे तिघेही आशिया चषक २०२५ स्पर्धेचा भाग नव्हते.

युवा खेळाडूंवर मोठी जबाबदारी

रोहित शर्माने कर्णधारपदाची निवृत्ती जाहीर केल्यानंतर आता टी-२० संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. सूर्याने कर्णधार म्हणून द्विपक्षीय मालिकांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पण मोठ्या स्पर्धेत तो पहिल्यांदाच भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून पहिली मोठी स्पर्धा जिंकण्याची संधी त्याच्याकडे असणार आहे. संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मासारखे युवा खेळाडू देखील पहिल्यांदाच मोठ्या स्पर्धेत ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.