Maheesh Theekshana Catch Video: आशिया चषक २०२५ स्पर्धेतील सुपर ४ फेरीतील शेवटचा सामना भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. भारतीय संघाने आधीच अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केलं आहे. त्यामुळे या सामन्याच्या निकाला गुणतालिकेवर काहीच फरक पडणार नाही. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना दुसऱ्याच षटकात भारतीय संघाला मोठा धक्का बसला. शुबमन गिल बाद होऊन माघारी परतला.

गिल आणि अभिषेकच्या जोडीने गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला दमदार सुरूवात करून दिली आहे. पण श्रीलंकेविरूद्ध सुरू असलेल्या सामन्यात या जोडीला हवी तशी सुरूवात करता आलेली नाही. दुसऱ्याच षटकात गिल ४ धावा करत माघारी परतला आहे. त्याला बाद करण्यासाठी महिश तीक्ष्णाने आपल्याच गोलंदाजीवर भन्नाट झेल घेतला.

महेश तिक्षणाचा भन्नाट झेल

तर झाले असे की,श्रीलंकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. श्रीलंकेकडून दुसरे षटक टाकण्यासाठी महिश तीक्ष्णा गोलंदाजीला आला. या षटकातील पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्माने गगनचुंबी षटकार मारला. त्यानंतर पुढील चेंडूवर १ धाव घेऊन त्याने गिलला स्ट्राईक दिली. षटकातील तिसऱ्या चेंडूवर गिलने समोरच्या दिशेने फटका मारला. या चेंडूवर महिश तीक्ष्णाने डाव्या बाजूला डाईव्ह मारत भन्नाट झेल घेतला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारत (Playing XI): अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती

श्रीलंका (Playing XI): पथुम निसंका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), कुसल परेरा, चरीथ असलंका (कर्णधार), जानिथ लियानागे, कमिंदू मेंडिस, दसन शनाका, वानिंदू हसरंगा, दुश्मंथा चमीरा, महिश तीक्ष्णा, नुवान तुषारा