India vs Pakistan Asia Cup final 2025 : भारत आणि पाकिस्तान संघ आज (रविवारी) आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात आमनेसामने येणार आहेत. आशिया कपच्या इतिहासात आज पहिल्यांदाच स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हे दोन्ही संघ खेळणार आहेत. दरम्यान हा अंतिम सामना भारतातील १०० हून अधिक चित्रपटगृहांमध्ये लाईव्ह दाखवला जाणार असल्याची घोषणा पीव्हीआरने केली होती. मात्र राज्यात शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून याविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आल्यानंतर आता पीव्हीआरने माघार घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या विरोधानंतर पीव्हीआर आयनॉक्सने महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण देशभरात भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप फायनलचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून देण्यात आली आहे.

शिवेसेना (ठाकरे) पक्षाच्या अधिकृत एक्स हँडलवरून “शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर आता संपूर्ण हिंदुस्थानात PVR कडून भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याचे सर्व लाईव्ह शो रद्द!!!” अशी पोस्ट करण्यात आली आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात ज्या पाकिस्तानचा संबंध आहे त्याच पाकिस्तानसोबत होणारे क्रिकेट सामने हे भारतीय जनतेच्या भावनांशी केलेला खेळ आहे. शिवसंचार सेनेचे अध्यक्ष अखिल चित्रे ह्यांनी ‘पीव्हीआर’ व्यवस्थापनाशी ह्याबाबत चर्चा केल्यानंतर पीव्हीआर चित्रपटगृहातील भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांचे सर्व शो रद्द केले, अशी माहिती शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून देण्यात आली आहे.

दुसऱ्या एका एक्स पोस्टमध्ये शिवसेना(ठकरे) पक्षाचे नेते अखिल चित्रे यांनी पीव्हीआरच्या कर्मचाऱ्यांशी झालेल्या संवादाचा दाखला दिला आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, “अजून एक #शिवसेनेचा_ठाकरी_दणका… पीव्हीआरचे प्रोग्रामिंग आणि ऑपरेशन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष थॉमस डिसोझा ह्यांनी शिवसेनेला संपर्क करून कळवलं आहे की, आम्ही संपूर्ण देशातील ‘भारत–पाकिस्तान क्रिकेट सामन्या’चे सर्व लाईव्ह शो रद्द करत आहोत… ‘शिवसेना’ कालही-आजही आणि उद्याही मुंबई-महाराष्ट्रातून संपूर्ण हिंदुस्थानावर प्रभाव टाकू शकते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं!”

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा सामना खेळला जाऊ नये यासाठी शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून वारंवार आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट संघाला आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची परवानगी दिल्याबद्दल पक्षाने मोदी सरकारवर आणि बीसीसीआयवर देखील टीका केली होती. या दहशतवादी हल्ल्यात २६ निरपाराध नागरिकांचा मृत्यू झाला होता.

संजय राऊतांची पीव्हीआरवर सडकून टीका

शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी यापूर्वी पोस्ट करत पीव्हीआरवर टीका केली होती. “हा तर नीच पणाचा कळस: PVR मधील” पी “ म्हणजे पाकिस्तान आहे काय? हे पीव्हीआर वाले भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचे थेट प्रक्षेपण सर्वत्र दाखवणार आहेत. ह्यांच्यात एवढी हिम्मत आणि निर्ल्लजपणा येतो कोठून? सोनम वांगचुक याना पाकिस्तानशी सहानुभूती ठेवल्याच्या आरोपाखाली देशद्रोही ठरवून अटक केली, आता त्याच आरोपाखाली या हरामखोर पीव्हीआर वाल्याना अटक करा, फडणवीस आहे एवढी हिम्मत? भारत पाकिस्तान सामना खेळणे,खेळवणे, दाखवणे,पहाणे, हा पहलगाम मधील सिंदूर उजाडलेल्या महिलांचा अपमान आहे, देश द्रोह आहे! क्रिकेट आणि दहशतवाद एकत्र चालणार नाही! पीव्हीआर तुमच्याकडे हिंदुतवादी जनतेचे लक्ष्य आहे!” असे संजय राऊत म्हणाले होते. यानंतर पीव्हीआरकडून देशभरातली प्रक्षेपण रद्द करण्यात आल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.