हार्दिक पंड्या व युजवेंद्र चहलनंतर आणखी एका भारतीय क्रिकेटपटूच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आल्याच्या चर्चा होत आहेत. क्रिकेटपटू मनीष पांडे आणि त्याची अभिनेत्री पत्नी अश्रिता शेट्टी यांच्यात सगळं आलबेल नसून हे दोघे विभक्त होणार असल्याचं म्हटलं जात आहे. दोघांनीही एकमेकांना त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर अनफॉलो केलं आहे. अश्रिताने तिच्या अकाउंटवरून पती मनीषबरोबरचे सर्व फोटो हटवले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंडिया डॉट कॉमच्या वृत्तानुसार, मनीष पांडे व त्याची पत्नी अश्रिता (Manish Pandey Ashrita Shetty Divorce Rumors) यांच्या नात्यात दुरावा आला आहे. सहा वर्षांपूर्वी २०१९ मध्ये दोघांनीही मोठ्या थाटामाटात लग्न केलं होतं; पण आता ते एकमेकांपासून वेगळे होण्याचा विचार करत आहेत. नेहमी एकत्र दिसणारे मनीष व अश्रिता आता सोशल इव्हेंटमध्ये एकत्र दिसत नाहीत. तसेच त्यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. मनीष व अश्रिताच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही एकमेकांबरोबरचा एकही फोटो नाही. त्यामुळे या दोघांच्या घटस्फोटांच्या चर्चांना उधाण आलं आहे.

मनीष पांडे हा भारतीय क्रिकेटपटू आहे आणि तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) कोलकाता नाईट रायडर्स तसेच इतर संघांसाठी खेळला आहे. २००९ साली, आयपीएल स्पर्धेत शतक झळकावणारा मनीष हा पहिला भारतीय फलंदाज ठरला होता. २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मनीषने तडाखेबंद शतक झळकावलं होतं. मनीष २०१८ मध्ये आशिया कप खेळणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता. फलंदाजीच्या बरोबरीने अफलातून क्षेत्ररक्षणासाठी मनीष ओळखला जातो.

लिलावात कोलकाता नाईट रायडर्स संघाने त्याला ताफ्यात सामील केलं. २०१४ ते २०१७ कालावधीत मनीष केकेआर संघाचा अविभाज्य भाग होता. याआधी त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुर, सनरायझर्स हैदराबाद, लखनौ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स, पुणे वॉरियर्स या संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे.

कोण आहे अश्रिता शेट्टी?

मनीष व अश्रिता यांनी २०१९ मध्ये लग्न करण्यापूर्वी काही काळ एकमेकांना डेट केलं होतं. अश्रिता ही तमिळ अभिनेत्री आहे आणि तिने काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. इन्स्टाग्रामवर तिचे दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. अश्रिताने ‘उदयम एनएच 4,’ ‘इंद्रजीत’, ‘ओरू कोन्नीयम मोनू कलवानिकलम’, ‘नान थान सिवा’, ‘तेलिकेडा बोली’, ‘सद्दू’ या सिनेमांमध्ये काम केलं आहे. मनीषशी लग्न केल्यानंतर ती मोठ्या पडद्यावर दिसली नाही.

दुसरीकडे, मनीष गेल्या काही वर्षांपासून भारतीय क्रिकेट संघाचा भाग नाही. त्याने भारतासाठी २९ एकदिवसीय आणि ३९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

अश्रिताच्या अलीकडच्या पोस्ट पाहिल्यास ती सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला गेली असून तेथील फोटो तिने पोस्ट केले आहेत. तर, मनीषने मागील ३८ आठवड्यांपासून इन्स्टाग्रामवर कोणतीच पोस्ट केलेली नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian cricketer manish pandey wife ashrita shetty divorce rumors after she deleted photos on social media ent disc news hrc