Virat Only Player To Score 7000 Runs In IPL: आयपीएल २०२३ च्या ५० व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने होते. या सामन्यात दिल्ली संघाने आरसीबीचा ७ गडी राखून पराभव केला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबी संघाने ४ गडी गमावून १८१ धावा केल्या होत्या. दरम्यान आरसीबीचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने शानदार अर्धशतक झळकावले. त्याचबरोबर विराट कोहलीने या सामन्यात एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.
आयपीएलमध्ये ७००० धावा करणारा एकमेव खेळाडू –
विराट कोहली शनिवारी आयपीएलच्या इतिहासात ७००० धावा करणारा पहिला खेळाडू बनला. विराट कोहलीसाठी हा त्याच्या शानदार कारकिर्दीतील आणखी एक मैलाचा दगड होता. ही कामगिरी केल्यानंतर कोहली म्हणाला की, मला सतत मेहनत करत राहायचे आहे. फिरोजशाह कोटला मैदानावर कोहलीने मोसमातील सहावे अर्धशतक ठोकले. त्याने ४६ चेंडूत ५५ धावांची खेळी खेळली.
शानदार खेळीनंतर विराट कोहली काय म्हणाला?
कोहली म्हणाला की, “मी माझ्या संघासाठी जे काही करण्याचा प्रयत्न करत आहे, त्या प्रवासातील ७००० धावा हा आणखी एक मैलाचा दगड आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या संघासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असता, तेव्हा ही फक्त एक चांगली संख्या असते.” २००८ मध्ये आयपीएल सुरू झाल्यापासून कोहलीने आपल्या २३३ व्या सामन्यात ही कामगिरी केली. या सामन्यापूर्वी त्याच्या नावावर ६,९८८ धावा होत्या.
हेही वाचा – MI vs CSK: ‘त्याच्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे’; एमएस धोनीकडून युवा गोलंदाजाचे कौतुक
प्रशिक्षकांचा आशीर्वाद घेतला –
मला सतत मेहनत करत राहायचे आहे, असे कोहली म्हणाला. हा सामना पाहण्यासाठी कोहलीचे कुटुंबीय आणि त्याचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा स्टेडियममध्ये उपस्थित होते. सामन्यापूर्वी त्याने प्रशिक्षकांच्या पाया पडून आशीर्वाद घेताना दिसला होता. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट म्हणाला, “तो एक खास क्षण होता.”
सामन्याबद्दल बोलायचे, तर आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरूने २० षटकांत ४ गडी गमावून १८१ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीने १६.४ षटकांत तीन विकेट गमावत १८७ धावा करून सामना जिंकला.