Venues For Remaining Matches Of IPL 2025: भारत- पाकिस्तान या दोन्ही देशातील तणावाची स्थिती पाहता आयपीएल २०२५ स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही देशांमध्ये संघर्षमय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेचा हवाला देऊन बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. तणाव कमी झाल्यानंतर ही स्पर्धा पुन्हा सुरू होऊ शकते. या स्पर्धेतील अजूनही १६ सामने शिल्लक आहेत. मात्र,यावेळी सामन्यांच्या ठिकाणांमध्ये बदल केला जाऊ शकतो.

आयपीएल २०३५ स्पर्धेत ७४ सामने खेळवले जाणार होते. आतापर्यंत ५८ सामने पूर्ण झाले असून अजूनही १६ सामने शिल्लक आहेत. ज्यात प्लेऑफच्या सामन्यांचा आणि फायनलचा देखील समावेश आहे. जर एक आठवड्यानंतर ही स्पर्धा सुरू झाली, तर बीसीसीआय वेळापत्रकात मोठा बदल करू शकते. हे १६ सामने काही मोजक्याच स्टेडियममध्ये खेळवले जाऊ शकतात. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बीसीसीआय आपत्कालीन पर्यायावर काम करत असल्याची माहिती एका सूत्राने दिली आहे.

भारतातील या ४ शहरात होणार सामने?

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, “आयपीएलचे उर्वरीत सामने चेन्नई, कोलकाता, हैदराबाद आणि बंगळुरूत खेळवले जाऊ शकतात. अशा स्थितीत तोडगा काढण्यासाठी एक आठवड्यांचा वेळ पुरेसा आहे. बीसीसीआय आपत्कालीन पर्यायावर काम करत आहे. सध्या तरी असं दिसून येत आहे की, आयपीएल जर पुढच्या आठवड्यात सुरू झाली तर हे सामने चेन्नई, बंगळुरू, कोलकाता आणि हैदराबाद या शहरांमध्ये खेळवले जाऊ शकतात.

आयपीएल २०२५ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. ठरलेल्या वेळापत्रकानुसार या स्पर्धेत एकूण ७४ सामने खेळवले जाणार आहेत. आतापर्यंत ५८ सामने पूर्ण झाले आहेत. तर १६ सामने अजूनही शिल्लक आहेत. स्पर्धेतील ५८ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये धरमशालेच्या मैदानावर होणार होता.

या सामन्याला सुरूवात होऊन १० षटकं होताच हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला आहे. त्यानंतर पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणाऱ्या सामन्याचे ठिकाण बदलण्यात आले होते. मात्र, आता ही स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.