CSK Sign young south african cricketer: पुढचा एबी डीव्हिलयर्स असं वर्णन होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेव्हिसला चेन्नई सुपर किंग्सने ताफ्यात सामील केलं आहे. तडाखेबंद फटकेबाजी करणाऱ्या डेवाल्डला बेबी एबी नावाने ओळखलं जातं. मुंबई इंडियन्सकडून खेळताना डेवाल्डने आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली होती. आता महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ससाठी तो खेळताना दिसणार आहे.
दक्षिण आफ्रिकेचं दोन टी२० सामन्यात प्रतिनिधित्व केलेल्या डेवाल्डने आयपीएलसह कॅरेबियन प्रीमिअर लीग, मेजर लीग क्रिकेट तसंच साऊथ आफ्रिका टी२० अशा ट्वेन्टी२० लीगमध्ये आपल्या बॅटची ताकद सिद्ध केली आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्येही डेवाल्डने दमदार सुरुवात केली आहे. २० सामन्यात ४१च्या सरासरीने चार शतक झळकावली आहेत.
मैदानात चौफेर फटकेबाजी करण्याच्या तसंच अनोखे फटके लगावण्याच्या क्षमतेमुळे डेवाल्डला ‘बेबी एबी’ असं टोपणनाव मिळालं.
चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड कोपऱ्याला झालेल्या फ्रॅक्चरमुळे हंगामात खेळू शकणार नाहीये. ऋतुराजच्या ऐवजी डेवाल्ड हा चेन्नईसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्याची क्षमता असलेला डेवाल्ड चेन्नईसाठी किमयागार ठरू शकतो. दरम्यान वेगवान गोलंदाज गुरजनप्रीत सिंग उर्वरित हंगामात खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. चेन्नईकडे एका विदेशी खेळाडूची जागा शिल्लक होती. त्यामुळे त्यांनी २.२ कोटी रुपये खर्चून डेवाल्डला ताफ्यात समाविष्ट केलं.
२०२२ मध्ये झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्सने डेवाल्डला संघात घेतलं होतं. मुंबई संघातील तिलक वर्मा हा डेवाल्डचा अतिशय चांगला मित्र आहे. पुढच्याच वर्षी मुंबईने त्याला रिटेनही केलं होतं. मात्र अंतिम अकरात चारच विदेशी खेळाडू या नियमामुळे डेवाल्डला मर्यादित संधी मिळाल्या. डेवाल्डने आयपीएल स्पर्धेत १० सामन्यात १३३.७च्या स्ट्राईकरेटने २३० धावा केल्या आहेत.
या हंगामापूर्वी झालेल्या लिलावात आश्चर्यकारकरीत्या डेवाल्ड अनसोल्ड ठरला होता. मुंबई इंडियन्सने त्याला संघात घेण्यात स्वारस्य दाखवलं नाही. त्याच्या क्षमतेची कल्पना असूनही डेवाल्डला कोणत्याही संघाने घेतलं नाही. चेन्नईचा संघ यंदाच्या हंगामात चाचपडताना दिसतो आहे. डेव्हॉन कॉनवे, रचीन रवींद्र, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा यांच्यापैकी कोणालाच मोठी खेळी करता आलेली नाही. फलंदाजीत सातत्याचा अभाव असल्याने चेन्नईला वारंवार पराभवाला सामोरं जावं लागत आहे. १७ वर्षांच्या इतिहासात चेन्नईने पहिल्यांदाच सलग पाच सामने गमावले आहेत. घरच्या मैदानावर अर्थात चेपॉकवर सलग तीन सामने त्यांनी गमावले आहेत. प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असेल तर चेन्नईला खेळात अमूलाग्र बदल करावा लागणार आहे. ऋतुराजच्या अनुपस्थितीत चेन्नईकरांचा लाडका थाला महेंद्रसिंग धोनीच संघाचं नेतृत्व करत आहे. धोनीच्या नेतृत्वात खेळण्याचा अनुभव डेवाल्डसाठी अनोखा असणार आहे.