Harbhajan Singh Jofra Archer Controversy: भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग आयपीएल स्पर्धेतील राजस्थान विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यावेळी समालोचन करताना जोफ्रा आर्चर बाबत एक टिप्पणी केल्यामुळे मोठ्या अडचणीत आला आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात काल (रविवारी) खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान समालोचन करताना, हरभजनने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरवर निशाणा साधला आणि त्याचे ‘काली टॅक्सी’ असे वर्णन केले. हरभजनच्या या टिप्पणीनंतर त्याच्यावर सर्वच स्तरातून मोठी टीका होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हरभजनच्या या टिप्पणीची सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा होत आहे. समालोचनादरम्यान हरभजन असे म्हणताना ऐकू आले की, “लंडनमध्ये काळ्या टॅक्सीचा मीटर वेगाने पळतो आणि इथे आर्चर साहेबांचा मीटर देखील वेगाने पळाला आहे.”

हरभजन सिंगच्या हकालपट्टीची मागणी

या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक चाहते हरभजनवर टीका करत आहेत. याचबरोबर त्याने माफी मागावी आणि आयपीएलच्या कॉमेंट्री पॅनलमधून त्याची हकालपट्टी करण्याची मागणी करत आहेत. दरम्यान, हरभजन सिंगने याबाबत अद्याप या संदर्भात कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही किंवा माफी मागितलेली नाही.

काय आहे प्रकरण?

हे प्रकरण रविवारी खेळल्या गेलेल्या सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याशी संबंधित आहे. या सामन्यात, इंग्लंड क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने राजस्थान रॉयल्सकडून १८ वे षटक टाकले. तेव्हा इशान किशन आणि हेनरिक क्लासेन मैदानावर फलंदाजी करत होते. आर्चरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर क्लासेनने सलग चौकार मारले तेव्हा हरभजन सिंगने टिप्पणी केली. तो म्हणाला, “लंडनमध्ये काळ्या टॅक्सीचे मीटर वेगाने पळतात आणि इथे आर्चर साहेबांचे मीटरही वेगाने धावला.”

हैदराबादचा ४४ धावांनी विजय

दुसरीकडे, हैदराबादने या सामन्यात दमदार कामगिरी करत विजय मिळवला. सनरायझर्स हैदराबादकडून इशान किशनने स्फोटक फलंदाजी करत केवळ ४५ चेंडूत शतक झळकावले. इशानने ४७ चेंडूत १०६ धावांची खेळी केली. इशानने त्याच्या वादळी खेळीत ११ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. हैदराबादने हा सामना ४४ धावांनी जिंकला. किशनला त्याच्या वादळी खेळीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दुकरीकडे राजस्थान रॉयल्सने हैदराबादला टक्कर देण्याचा प्रयत्न केला पण ते २० षटकांत २४४ धावाच करू शकले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harbhajan singh racist remark jofra archer ipl 2025 aam