Hardik Pandya Reaction on Mumbai Indians Loss: आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सची स्थिती सामन्यागणिक अधिक वाईट होत चालली आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ केवळ आठ सामन्यांमध्ये पाच वेळा पराभूत झाला आहे. काल. २२ एप्रिलला पार पडलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा नऊ गडी राखून टिचून पराभव केला आहे. सामन्यानंतर एमआयचा कर्णधार हार्दिक पंड्याने संघाच्या पराभव का झाला व पुढच्या वेळी नक्की काय बदल करता येतील याविषयी भाष्य केलं आहे. हार्दिकने कुणाचंही प्रत्यक्ष नाव घेतलं नसलं तरी त्याच्या काही विधानांमधून सलामीवीरांकडे त्याचा रोख होता असं म्हणता येईल. नेमकं असं हार्दिक काय म्हणाला, चला बघूया..

पॉवरप्लेमध्येच गमावला सामना? हार्दिक काय म्हणाला?

सामन्यानंतरच्या सादरीकरणात, हार्दिकचं म्हणणं होतं की, पॉवरप्लेमध्ये नीट कामगिरी न झाल्याने एमआयने स्वतःला अडचणीत आणले. मॅचच्या हायलाईट सांगायच्या तर फलंदाजी करताना पॉवरप्लेमध्ये रोहितने सहा धावा केल्या तर इशान किशन आपले खाते देखील उघडू शकला नाही. नंतर तिलक वर्मा आणि नेहल वढेरा यांच्या कामगिरीमुळे संघ १८० धावांपर्यंत पोहोचला. याविषयी हार्दिक म्हणाला की, “तिलक आणि नेहलने केलेली फलंदाजी कौतुकास्पद होती, सुरुवातीला दोन विकेट गमावल्यावर आम्हाला असं वाटलं नव्हतं की आम्ही १८० पर्यंतही पोहोचू. आम्ही फलदांजी करताना खेळ पद्धतीशीर संपवला नाही म्हणून १०- १५ धावा मागे पडलो.”

आमच्यासाठी तो दिवस वाईट होता कारण…

तर गोलंदाजीच्या बाबत हार्दिक म्हणाला की, पॉवरप्लेमध्ये मुंबईच्या गोलंदाजांनी आरआरच्या फलंदाजांना खूप जागा दिली होती. म्हणजे साधारण पॉवरप्लेमध्ये स्टंप्सवर रोखून मारा करणं आवश्यक आहे. पॉवरप्लेच्या षटकांमध्ये आम्ही स्वैर मारा केला त्यामुळे खूप धावा दिल्या. क्षेत्ररक्षणातही आमच्या हातून खूप चुका झाल्या. सगळ्या आघाड्यांवर आमच्यासाठी तो दिवस चांगला नव्हता आणि याउलट राजस्थानने तिन्ही आघाड्यांवर सर्वोत्तम खेळ करत आम्हाला मागे टाकलं. अर्थात सामना संपल्यावर खेळाडूंना दोष देण्यात अर्थ नाही. इथे प्रत्येक जण प्रोफेशनल आहे त्यांना त्यांची भूमिका माहिती आहे.”

हे ही वाचा<< “रोहित शर्माच्या सल्ल्यावरच MI च्या खेळाडूंचा..”, इरफान पठाणने सांगितला ‘त्या’ Video चा अर्थ; म्हणाला, “हार्दिकपेक्षा..”

दरम्यान, राजस्थान रॉयल्सकडून दुसऱ्यांदा पराभूत झाल्यावर मुंबई इंडियन्स आपल्या गाठीशी सहा पॉईंट्स घेऊन सातव्या स्थानी आहे तर राजस्थान यंदाची सर्वात यशस्वी टीम बनत असून अजूनही १४ पॉईंट्ससह पहिल्या स्थानी कायम आहे.