IPL 2024, Lucknow Super Giants vs Chennai Super Kings: लखनौ सुपरजायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात शुक्रवारी एक अटीतटीचा सामना खेळवला गेला. या सामन्यात केएल राहुच्या नेतृत्त्वाखालील लखनौ संघाने ऋतुराजच्या चेन्नईच्या ८ विकेट्सने मोठा पराभव केला. पण या सामन्यानंतर मात्र दोन्ही संघांच्या कर्णधारांना मोठा धक्का बसला. एकाना स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यानंतर बीसीसीआयने दोन्ही कर्णधारांवर १२ लाखांचा दंड ठोठावला आहे.

शुक्रवारी लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारांना स्लो ओव्हर रेटसाठी मोठा दंड ठोठावण्यात आला. बीसीसीआयने केएल राहुल आणि ऋतुराज गायकवाड यांना १२-१२ लाखांचा दंड ठोठावला. विशेष म्हणजे आयपीएलच्या या मोसमातील एका सामन्यात दोन्ही कर्णधारांवर एवढा दंड ठोठावण्याची ही पहिलीच वेळ आहे.

हेही वाचा-IPL 2024: पोलार्ड आणि टीम डेव्हिडवर आयपीएलकडून कारवाई, मुंबई-पंजाबमधील लाईव्ह सामन्यातील ‘ही’ चूक पडली महागात

बीसीसीआयने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून दोन्ही संघांच्या कर्णधारांवर ठोठावण्यात आलेल्या दंडाची माहिती दिली आहे. लखनौच्या भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या ३४व्या सामन्यातील स्लो ओव्हर रेटमुळे लखनौ सुपरजायंट्सचा कर्णधार केएल राहुलला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर निवेदनात पुढे म्हटले आहे की, “तसेच चेन्नई सुपरजायंट्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याला लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध स्लो ओव्हर रेटमुळे दंड ठोठावण्यात आला आहे, त्यामुळे दोन्ही कर्णधारांना १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.”

लखनौ सुपरजायंट्सने घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जचा एक षटक बाकी असताना ८ गडी राखून पराभव केला. एकना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात CSKने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ६ गडी गमावून १७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौ सुपरजायंट्सने १९ षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले. केएल राहुल आणि क्विंटन डिकॉकच्या पहिल्या विकेटसाठी १३४ धावांच्या भागीदारीने लखनौच्या विजयाचा पाया रचला.