मुंबई इंडियन्सचा फलंदाज टीम डेव्हिड आणि फलंदाजी प्रशिक्षक किरॉन पोलार्ड यांना पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. आयपीएलने स्वतः टीम डेव्हिड आणि पोलार्डवर लावण्यात आलेल्या दंडाबाबत माहिती दिली आहे.

डेव्हिड आणि पोलार्ड यांनी आचारसंहितेच्या कलम २.२० अंतर्गत लेव्हल-१ चा गुन्हा केला आहे. त्यामुळे डेव्हिड आणि पोलार्डला मॅच फीच्या २० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. या आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास सामनाधिकारींचा निर्णय अंतिम मानला जातो. दोघांनीही आपली चूक मान्य केली आहे. पण पोलार्ड आणि डेव्हिडला शिक्षा नेमकी काय झाली, काय हे संपूर्ण प्रकरण, जाणून घ्या.

मुंबई इंडियन्सच्या पोलार्ड आणि टीम डेव्हिडवर आयपीएलने का केली कारवाई?

पंजाबविरूद्धच्या सामन्यात डगआऊटमधून केलेली खुणवाखुणवी या दोघांना चांगलीच महागात पडली आहे. मुंबईच्या डावातील १५व्या षटकात अर्शदीप सिंग गोलंदाजी करत होता. त्याने ऑफ साईडच्या दिशेने सूर्याला चेंडू टाकला. तेव्हा पंचांनी काहीच निर्णय दिला नाही किंवा सूर्यानेही काही प्रतिक्रिया दिली नाही. पण मुंबईच्या डगआऊटमध्ये बसलेल्या प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी रिप्लेमध्ये पाहून तो वाईड असल्याचे दाखवले, पण सूर्याचे तेव्हा त्यांच्याकडे लक्ष नव्हते. त्यानंतर तिथेच बाजूला बसलेल्या पोलार्ड आणि टीम डेव्हिड यांनी रिव्ह्यू घेण्याचे हातवारे केले आणि आपल्यावर कॅमेरा असल्याने त्यांनी लगेच या खाणाखुणा लपवल्या. त्यांच्या खाणाखुणांनंतर सूर्याने रिव्ह्यू घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मैदानावर क्षेत्ररक्षण करत असलेल्या पंजाब किंग्सच्या कर्णधाराने म्हणजेच सॅम करनने हे हातवारे पाहिले आणि पंचांकडे तक्रार केली. पण तरीही वाईडसाठी मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय मागितला. या सगळ्या प्रकरणामुळे पोलार्ड आणि टीम डेव्हीडवर कारवाई करण्यात आली, ज्याचा व्हीडिओही सामन्यानंतर चांगलाच व्हायरल होत होता.