KL Rahul 5th IPL Century in DC vs GT: केएल राहुलने आयपीएल २०२५ मध्ये गुजरात टायटन्सविरूद्ध खेळताना आपलं पाचवं आयपीएल शतक झळकावलं. या शतकासह राहुलने एक अनोखा विक्रमही आपल्या नावे केला आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी सलामीला उतरलेला केएल राहुल शतकासह संघाला २०० धावांपर्यंत नेत नाबाद माघारी परतला. दिल्लीच्या ताफ्यात आल्यापासून राहुलची आक्रमक फलंदाजी पाहायला मिळत आहे आणि आता त्याने शतकही झळकावलं आहे.
केएल राहुलने अरूण जेटली स्टेडियमवर खेळताना गुजरातविरूद्ध ६० चेंडूत शतक झळकावलं. सुरूवातीला संथ सुरूवात केल्यानंतर राहुलने अर्धशतकानंतर आपले गियर बदलले आणि ३ वर्षांनंतर आयपीएलमध्ये शतक झळकावलं आहे. गुजरातविरूद्धच्या सामन्यात राहुलची बॅटिंग पोझिशन बदलण्यात आली आणि तो सलामीला उतरला. सलामीला उतरताच राहुलचा शानदार फॉर्म पाहायला मिळाला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीसाठी राहुल सलामीवीर म्हणून मैदानात आला आणि संथ सुरुवातीनंतर त्याने धावांचा वेग वाढवला. या फलंदाजाने ३५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर त्याने धावांची गती वाढवली आणि राहुलने डावाच्या १९ व्या षटकात आपलं शतक पूर्ण केले. राहुलने ६५ चेंडूत १४ चौकार आणि ४ षटकारांसह १७२ च्या स्ट्राईक रेटने ११२ धावांची नाबाद खेळी केली.
केएल राहुलच्या शतकासह दिल्लीने या महत्त्वाच्या सामन्यात२० षटकांत ३ बाद १९९ धावांचा टप्पा गाठला आणि गुजरातला विजयासाठी २०० धावांचं आव्हान दिलं आहे. दरम्यान प्लेऑफच्या दृष्टीने दिल्ली कॅपिटल्ससाठी हा महत्त्वाचा सामना असणार आहे. दिल्लीला प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असेल तर उर्वरित सर्व सामने जिंकावे लागणार आहेत.
केएल राहुल दिल्ली कॅपिटल्सपूर्वी आयपीएलमध्ये अनेक फ्रँचायझीकडून खेळला आहे. यापैकी त्याने पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स कडून खेळताना शतकं झळकावली आहेत. आता त्याने दिल्ली कॅपिटल्सविरूद्धही शतकी कामगिरी केली आहे. यासह आयपीएलच्या इतिहासात ३ वेगवेगळ्या संघांकडून खेळताना शतक करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.