Corona Latest Updates Cases rising in India : जानेवारी २०२० ते २०२२ च्या उतरारार्धापर्यंत जगभर करोनाने (कोव्हिड-१९) थैमान घातलं होतं. या काळात जगभरातील अनेक देशांनी लॉकडाऊन लागू केला होता. मात्र, या तीन वर्षांमध्ये आणि त्यानंतरही लोक मास्क लावल्याशिवाय बाहेर पडत नव्हते. या काळात एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवणारी, सतत सॅनिटायझरचा वापर करणारी, अधून-मधून साबणाने हात स्वच्छ धुणारी माणसं आसपास दिसत होती. आता पुन्हा एकदा तसंच काहीसं चित्र पाहायला मिळत आहे. प्रामुख्यने क्रिकेटच्या मैदानात (आयपीएल) खेळाडू व संघ व्यवस्थापनातील इतर सदस्य खबरदारी घेताना दिसत आहेत.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये बुधवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा सामना खेळवण्यात आला. या सामन्यानंतर खेळाडू व संघ व्यवस्थापनातील सदस्य, फ्रेंचायजी मालक एकमेकांना भेटण्यापूर्वी, हस्तांदोलन करण्यापूर्वी सॅनिटायझरने हात स्वच्छ करत असल्याचं दिसत होतं. हे चित्र पाहून अनेकांच्या करोना काळातील आठवणी ताज्या झाल्या आहेत. तर काहींनी भीती देखील व्यक्त केली आहे.

मुंबईच्या संघाकडून खबरदारी

दिल्लीच्या संघावर मात केल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाचे मालक अनंत अंबानी व नीता अंबानी हे दोघेही मैदानात दाखल झाले. मात्र खेळाडूंना भेटण्यापूर्वी अनंत व नीता अंबानी यांनी सॅनिटायझरने हात स्वच्छ केले. तसेच मुंबईचे खेळाडू सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, दिपीक चाहर या तिघांनी देखील सॅनिटायझरने हात स्वच्छ केले. खेळाडू एकमेकांना सॅनिटायझर देऊन खबरदारीची सूचना करताना दिसले.

करोनाने पुन्हा डोकं वर काढलं?

हाँगकाँग, सिंगापूर आणि दक्षिण आशियामध्ये करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. भारतातही अनेक शहरांमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. मुंबईमध्येही करोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. मुंबईमध्ये गेल्या २० दिवसांमध्ये करोनाचे ९५ रुग्ण सापडले असून दोघांचा करोनाने मृत्यू झाला आहे. कालचा आयपीएल सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. त्यामुळे मुंबईत अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्याप्रमाणे मुंबई व दिल्लीचे खेळाडू काल मैदानात खबरदारी घेताना दिसले. मुंबईत गेल्या काही महिन्यांत करोनाचे तुरळक रुग्ण सापडत होते. मात्र, मे महिन्यांत अचानक यात वाढ झाली आहे. करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या वीस दिवसांत करोनाचे तब्बल ९५ रुग्ण सापडले आहेत.