Harbhajan Singh’s statement on Sanju Samson : आयपीएल २०२४ हंगामानंतर जूनमध्ये आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा १ ते २९ जून दरम्यान वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत आयोजित केली जाणार आहे. यावेळी भारतीय संघ आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याच्या निर्धाराने स्पर्धेत सहभागी होईल. टीम इंडियाने शेवटची आयसीसी ट्रॉफी एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली २०१३ मध्ये जिंकली होती. आता पुन्हा एकदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघ पुन्हा एकदा आव्हान देण्यासाठी सज्ज झाला आहे. तत्पूर्वी भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने एक मोठ वक्तव्य करताना रोहितनंतर भारतीय संघाची धुरा कोणाच्या हाती असेल, याबद्दल सांगितले आहे.

तो खेळाडू यष्टीरक्षकांच्या शर्यतीत आहे –

आयपीएलच्या चालू मोसमातील आतापर्यंतच्या कामगिरीचा विचार करता यष्टिरक्षकाची बरीच चर्चा सुरू आहे. या शर्यतीत ऋषभ पंत, संजू सॅमसन, इशान किशन, दिनेश कार्तिक, केएल राहुल आणि जितेश शर्मा यांचा समावेश आहे. आता निवडकर्ते कोणाचा संघात समावेश करतात हे पाहायचे आहे. दरम्यान, भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने उपकर्णधारपदासाठी नवीन नाव पुढे केले आहे. सध्या हार्दिक पंड्या संघाचा उपकर्णधार आहे.

हरभजनने भावी कर्णधार म्हणून सॅमसनचे सुचवले नाव –

हरभजनने सर्वप्रथम यष्टिरक्षकाबद्दल आपले मत मांडले. तो म्हणाला की, संजू सॅमसनचे संघात स्थान थेट निर्माण झाले आहे. याशिवाय सॅमसनला उपकर्णधार बनवावे आणि रोहित शर्मानंतर टी-२० मध्ये कर्णधारपदासाठी तयार करावे, असेही त्याने म्हटले आहे. सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान संघाने चमकदार कामगिरी केली आहे. राजस्थानने २०२२ च्या आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. यावेळी संघ ८ पैकी ७ सामने जिंकून गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.

हेही वाचा – IPL 2024 : पाच सामन्यांनंतर परतला आणि मुंबई इंडियन्सच्या डावाला खिंडार पाडणारा संदीप शर्मा कोण?

हरभजनने सिंग आपल्या एक्स पोस्टमध्ये काय म्हणाला?

मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या मोठ्या विजयानंतर हरभजन सिंगने एक्सवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये लिहले, “यशस्वी जैस्वालची खेळी हा पुरावा आहे की त्याचा ‘क्लास परमनंट’ असून ‘फॉर्म टेम्पररी’ आहे. यशस्वी आणि यष्टीरक्षक फलंदाजाबद्दल कोणताही वाद नसावा. संजू सॅमसनने टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात यावे आणि रोहित शर्मानंतर पुढील टी-२० संघाचा कर्णधार म्हणूनही त्याला तयार केले जावे. याबद्दल कोणाला काही शंका आहे का?”

राजस्थान मुंबईचा ९ विकेट्सनी उडवला धुव्वा –

राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर घरच्या मैदानावर ९ विकेट्सने शानदार विजय मिळवला. मुंबईचा कर्णधार हार्दिकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या संघाने २० षटकांत ९ गडी गमावून १७९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थानने १८.४ षटकांत १ बाद १८३ धावा करत सामना जिंकला. यशस्वी जैस्वाल ६० चेंडूत १०४ धावा केल्यानंतर नाबाद राहिला आणि सॅमसन २८ चेंडूत ३८ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. तत्पूर्वी गोलंदाजी करताना संदीप शर्माने १८ धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या.