Who is Sandeep Sharma : आयपीएल २०२४ मधील ३८वा सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा ९ विकेट्सनी धुव्वा उडवत यंदाच्या हंगामातील सातवा विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेताना राजस्थानने संदीप शर्माच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर मुबईला १७९ धावांवर रोखले.
राजस्थानने मुंबईला संदीप शर्माच्या भेदकतेच्या जोरावर २० षटकांत ९ बाद १७९ धावांवर रोखले. हे लक्ष्य राजस्थानने १८.४ षटकांत १ बाद १८३ धावा करून पार केले. यशस्वी- जॉस बटलर यांनी ४८ चेंडूंत ७४ धावांची सलामी दिल्यानंतर यशस्वीने कर्णधार संजू सॅमसनसोबत ६५ चेंडूंत नाबाद १०९ धावांची भागीदारी करत संघाचा विजय निश्चित केला. तत्पूर्वी वेगवान गोलंदाज संदीप शर्माने अखेरच्या षटकात तीन विकेट्स घेत एकूण ५ विकेट्स घेतल्या. संदीप शर्मा राजस्थानच्या मूळ संघात नव्हता. लिलावात तो अनसोल्ड गेला होता. प्रसिध कृष्णा दुखापतग्रस्त झाल्याने राजस्थानने संदीप शर्माला संघात समाविष्ट केलं.
विराट कोहलीला सातवेळा केलंय आऊट –
आयपीएल स्पर्धेत कोहलीला तब्बल सातवेळा आऊट करणारा आणि याच स्पर्धेत बुमराहप्रमाणेच आकडेवारी असणारा संदीप शर्मा तुम्हाला माहितेय का? तुम्ही अचूक वाचलंय- संदीपने आयपीएल स्पर्धेत विराट कोहलीला सातवेळा तंबूचा रस्ता दाखवला आहे. दुसरीकडे आयपीएलच्या ९० मॅचेसनंतर संदीप आणि बुमराह यांच्या आकडेवारीत कमालीचं साम्य आहे. मात्र तरीही संदीप प्रसिद्धीपासून आणि टीम इंडियापासून दूर आहे.
वेगवान गोलंदाजांची सर्वसाधारणपणे असती तशी उंची नाही. प्रतिस्पर्धी संघातील बॅट्समनला धडकी भरवेल अशी शरीरयष्टी नाही. बॅट्समनची भंबेरी उडेल असा वेग नाही. बॅट्समनची एकाग्रता भंग करण्यासाठी शेरेबाजी, शिवीगाळ, हावभाव, खाणाखुणा नाहीत. मात्र प्रतिस्पर्ध्यांचा सखोल अभ्यास, खेळपट्टीचा नूर ओळखून अचूक टप्प्यावरची स्विंग बॉलिंग, चौकार-षटकारांनी खचून न जाता सापळा रचून बॅट्समनला कोंडीत पकडणं यामध्ये संदीपची हुकूमत आहे.
संदीप शर्मा मूळचा पंजाबमधल्या पतियाळा येथील रहिवासी –
मूळचा पंजाबच्या असलेल्या संदीपने पंजाबमधल्या पतियाळा इथं शाळेत क्रिकेट खेळायला सुरुवात केली. संदीप तेव्हा बॅट्समन होता. कोच.. यांनी त्याला बॉलिंगवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं. २०१० मध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धत संदीप भारतीय संघात होता. संदीपने ६ मॅचमध्ये ७ विकेट्स घेतल्या होत्या. २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियात आयोजित अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने जेतेपदावर नाव कोरलं. संदीपने त्या स्पर्धेत १२ विकेट्स घेतल्या होत्या. फायनलमध्ये संदीपने चार विकेट्स घेत यजमान ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडलं होतं. युवा वर्ल्डकप स्पर्धेतली कामगिरी लक्षात घेऊन आयपीएल स्पर्धेतील किंग्ज इलेव्हन पंजाबने संदीपला ताफ्यात समाविष्ट केलं.
आयपीएल पदार्पण –
११ मे २०१३ रोजी मोहाली इथं झालेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीत संदीपने आयपीएल पदार्पण केलं. पर्दापणाच्या लढतीतच संदीपने तीन विकेट्स पटकावल्या. त्या हंगामात संदीपला अंतिम अकरात खेळण्याची संधी तीनदाच मिळाली मात्र त्याच्यातली गुणवत्ता प्रशिक्षकांनी हेरली. म्हणूनच २०१४ हंगामात संदीपने किंग्ज इलेव्हनसाठी ११ मॅचेसमध्ये १९.६६ इकॉनॉमी रेटने १८ विकेट्स घेतल्या. त्या हंगामात पंजाबने प्लेऑफपर्यंत मजल मारली होती. त्या वाटचालीत संदीपचा वाटा मोलाचा होता. २०१५ मध्येही चांगली कामगिरी कायम राखत संदीपने १४ विकेट्स घेतल्या.
हेही वाचा – IPL 2024: हार्दिकची मिसफिल्डिंग; तुषारा असा झाला व्यक्त, VIDEO होतोय व्हायरल
पॉवरप्ले स्पेशालिस्ट –
ट्वेन्टी-२० फॉरमॅटमध्ये पहिल्या सहा ओव्हर पॉवरप्लेच्या असतात. त्यावेळी ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर दोनच फिल्डर ठेवता येतात. या टप्प्यात बॉलिंग करणे अत्यंत आव्हानात्मक असतं. कारण टप्पा थोडा चुकला की कत्तल होणं साहजिक. बॅट्समनने मारलेला फटका रोखण्यासाठी पुरेशी माणसं बाऊंड्रीवर उभी करता येत नाहीत हाही मुद्दा असतो. त्यामुळे अनेक चांगले बॉलर पॉवरप्लेमध्ये मार खातात. काही बॉलर पॉवरप्लेमध्ये बॉलिंग करणं टाळतात. संदीप शर्मा याबाबतीत अपवाद आहे. आयपीएल स्पर्धेत पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तो बॉलर आहे. बॉल स्विंग करून बॅट्समनला बुचकळ्यात टाकणारा बॉलर अशी संदीपची ओळख आहे. हैदराबादकडून खेळताना संदीपने भात्यात नकलबॉलची भर घातली आहे. हा बॉल ओळखून खेळणं बॅट्समनला अवघड होतं.
भारतासाठी पदार्पण –
२०१५ मध्ये भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यासाठी प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. संदीपला त्यावेळी भारतीय संघात समाविष्ट करण्यात आलं होतं. १७ जुलै रोजी हरारे इथं झालेल्या ट्वेन्टी-२० सामन्यात संदीपने भारतासाठी पदार्पण केलं. संदीपच्या बरोबरीने मनीष पांडे, केदार जाधव, स्टुअर्ट बिन्नी, अक्षर पटेल यांनी भारतासाठी ट्वेन्टी-२० पदार्पण केलं. त्या मॅचमध्ये संदीपला विकेट मिळवता आली नाही. दोन दिवसांनंतर दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात संदीपने पहिली विकेट मिळवली. या दौऱ्यानंतर संदीपचा टीम इंडियासाठी विचार झालेला नाही.
मोठ्या बॅट्समनची शिकार करण्यात पटाईत –
बॉलर किती विकेट घेतो याबरोबरीने तो कोणाला आऊट करतो हेही तितकंच महत्त्वाचं असतं. टेलएंडर्सना आऊट करणं तुलनेने सोपं असतं. समोरच्या संघातील मुख्य बॅट्समनला आऊट करणं हे खरं आव्हान असतं. संदीप शर्माची खासियत इथेच आहे. विराट कोहली, ख्रिस गेल, रोहित शर्मा अशा मोठ्या प्लेयरला संदीप आऊट करतो. ख्रिस गेलला बॉलरचा कर्दनकाळ संबोधलं जातं. पण बॉल स्विंग होतो तेव्हा गेलला खेळताना अडचण होते. संदीप हे करण्यात माहीर आहे. बॅट्समनच्या डोळ्यासमोरून बॉल स्विंग होतो. काही बॅट्समन लवकर फटका खेळल्यामुळे तर काही बॅट्समन खूप उशीर केल्यामुळे संदीपच्या जाळ्यात अडकतात.
हेही वाचा – Video: “IPL मध्ये वापसीसाठी सोपा मार्ग..” इरफान पठाणचा हार्दिक पंड्याला शाब्दिक चिमटा, म्हणाला, “आदर नाही…”
दुखापतींचं ग्रहण –
२०१४ मध्ये संदीपला स्ट्रेस फ्रॅक्चर झालं. खांद्याच्या दुखापतीमुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यातून सावरण्यासाठी त्याला वर्षभराचा वेळ लागला. या काळात त्याच्या हालचालींवर मर्यादा आल्या. फास्ट बॉलरसाठी खांदा खूपच महत्त्वाचा असतो. खांद्यावरच शस्त्रक्रिया झाल्याने स्विंग बॉलर असणाऱ्या संदीपला अॅक्शनमध्ये काही बदल करावे लागले. यंदाच्या आयपीएल हंगामात भुवनेश्वर कुमार दुखापतग्रस्त झाल्याने संदीप शर्मावर अनुभवी फास्ट बॉलर म्हणून जबाबदारी वाढली आहे. याच हंगामात संदीपने आयपीएल स्पर्धेत संदीपने शंभरावी विकेट्स घेतली. हा विक्रम करणारा तो केवळ तेरावा बॉलर आहे. २७ वर्षीय संदीपने आयपीएल तसंच डोमोस्टिक क्रिकेटमधल्या प्रदर्शनात सातत्य ठेवलं तर भविष्यात भारतासाठी पुन्हा ट्वेन्टी-20 आणि अन्य फॉरमॅटमध्येही खेळताना दिसू शकतो.