Shreyas Iyer Angry On Shashank Singh, PBKS vs MI: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्ज संघाने आयपीएल २०२५ स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पंजाब किंग्जने क्वालिफायर २ सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला आणि ११ वर्षांनंतर अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं. आता पंजाबचा संघ ३ जूनला होणाऱ्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सामना करणार आहे. श्रेयस अय्यरसह संपूर्ण संघाने पंजाबच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. दरम्यान सामन्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर शशांक सिंगवर भडकताना दिसून आला. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पंजाब किंग्ज संघासाठी हा सामना अतिशय महत्वाचा होता. कारण जे गेल्या ११ वर्षांत झालं नव्हतं, ते या सामन्यात करून दाखवण्याची संधी होती. जेव्हा संघाला खूप जास्त गरज होती. तेव्हा कर्णधार श्रेयस अय्यर शेवटपर्यंत उभा राहिला. त्यामुळे या विजयानंतर श्रेयस अय्यर शशांक सिंगवर भडकला. खेळाडू विजयानंतर हात मिळवत होते. त्यावेळी श्रेयस अय्यर शशांक सिंगवर संताप व्यक्त करताना दिसून आला. यासह त्याने हात मिळवणंही टाळलं
नेमकं काय घडलं?
या सामन्यात पंजाब किंग्ज संघाला २०० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करायचा होता. त्यामुळे भागीदारी करणं खूप महत्वाचं होतं. सलामी जोडी स्वस्तात माघारी परतल्यानंतर, श्रेयस अय्यर आणि नेहाल वढेराने मिळून पंजाब किंग्जला सामन्यात कमबॅक करून दिलं. मात्र नेहाल वढेरा बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा सामना बरोबरीत आला. श्रेयस अय्यर एका बाजूने तुफान फटकेबाजी करत होता. त्याला दुसऱ्या बाजूला असा फलंदाज हवा होता जो त्याला साथ देईल आणि विकेट देणार नाही.
शशांक सिंग फलंदाजीला आला आणि त्याने ट्रेंट बोल्टच्या षटकात मिड ऑनच्या दिशेने फटका मारला आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला. ही धाव पूर्ण होऊ शकली असती, मात्र तो वेगाने धावला नाही. इतकंच काय, तर गरज असताना त्याने डाईव्ह सुद्धा मारली नाही. हार्दिक पांड्याने वेगाने थ्रो करत त्याला धावबाद केलं. त्यामुळे त्याला अवघ्या २ धावांवर तंबूत परतावं लागलं. दरम्यान श्रेयस अय्यर एका बाजूने उभा राहिला आणि त्याने आपल्या संघाला ५ गडी राखुन विजय मिळवून दिला.
पंजाबचा मुंबईवर दणदणीत विजय
या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. मुंबई इंडियन्सकडून फलंदाजी करताना सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माने प्रत्येकी ४४–४४ धावांची खेळी केली. तर जॉनी बेअरस्टोने ३८ आणि नमन धीरने ३७ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या २०३ धावांवर पोहोचवली. या धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्ज संघाने नाबाद ८७ धावांची खेळी करत पंजाबला ५ गडी राखून विजय मिळवून दिला.