नवी दिल्ली : ‘वयाच्या १४ व्या वर्षी तुम्ही काय करत होतात? हा मुलगा विश्वातील सर्वोत्तम गोलंदाजांविरुद्ध सहजपणे फटकेबाजी करत आहे. वैभव सूर्यवंशी – नाव कायम लक्षात ठेवा!’ अशी प्रतिक्रिया भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने व्यक्त केली. डावखुऱ्या वैभवने ‘आयपीएल’मधील आपल्या केवळ तिसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध ३५ चेंडूंत शतक साकारण्याची किमया साधली. त्याने या खेळीसह साऱ्यांनाच थक्क करून सोडले. यात युवराज, सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंचाही समावेश होता. वैभवची विक्रमी खेळी ही भारतीय क्रिकेटमधील अद्भुत प्रतिभेचे प्रतीक होती, असे हरभजन म्हणाला.

‘आयपीएल’ला २००८मध्ये सुरुवात झाली. या स्पर्धेच्या तिसऱ्या हंगामात २०१० मध्ये युसूफ पठाणने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना ३७ चेंडूंत शतक साकारले होते. त्याच्या या विक्रमी खेळीच्या वर्षभरानंतर म्हणजेच २०११ मध्ये वैभव सूर्यवंशीचा जन्म झाला. आता याच वैभवने राजस्थानकडूनच खेळताना युसूफचा विक्रम मोडीत काढला आहे.

‘‘आयपीएलमध्ये सर्वांत जलद शतक साकारणारा भारतीय खेळाडू म्हणून माझा विक्रम मोडीत काढल्याबद्दल वैभवचे अभिनंदन. माझ्याप्रमाणेच तूसुद्धा राजस्थान रॉयल्सकडून खेळताना हा विक्रम रचलास हे खूप खास आहे. युवा खेळाडू आणि राजस्थान रॉयल्स फ्रँचायझी हे नाते वेगळेच आहे,’’ असे युसूफने ‘एक्स’वर लिहिले. युसूफप्रमाणेच भारतीय क्रिकेटमधील अनेक नामांकितांनी वैभवचे कौतुक केले.

‘‘वैभवचा निडरपणा, त्याच्या बॅटचा वेग, चेंडूचा टप्पा लवकर ओळखण्याची आणि प्रत्येक चेंडू तितक्याच ऊर्जेने मारण्याची क्षमता यामुळेच त्याला इतकी उत्कृष्ट खेळी साकारणे शक्य झाले. वैभव, खूप छान खेळलास,’’ अशा शब्दांत सचिन तेंडुलकरने वैभवची स्तुती केली.

तसेच भारताचे माजी सलामीवीर कृष्णमचारी श्रीकांत यांनी वैभवला ‘भारतीय क्रिकेटमधील पुढील सुपरस्टार’ म्हणून संबोधले. ‘‘वयाच्या १४व्या वर्षी अन्य मुले काहीतरी होण्याचे स्वप्न पाहात असतात, त्याच वयात वैभव ‘आयपीएल’मध्ये जेतेपदासाठी दावेदार असलेल्या गुजरात टायटन्स संघाविरुद्ध शतक करत आहे. त्याने दाखवलेला संयम, धैर्य आणि त्याच्या फलंदाजीचा दर्जा, हा त्याच्या वयापेक्षा कितीतरी मोठा आहे. भारतीय क्रिकेटमधील पुढील ‘सुपरस्टार’ उदयास आला आहे,’’ असे श्रीकांत म्हणाले.

भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने वैभवच्या खेळीला ‘अविश्वसनीय’ म्हटले.

हरभजनकडून सल्ला

सामन्यानंतर ‘आयपीएल’चे प्रसारण करणाऱ्या वाहिनीवर वैभवची प्रतिक्रिया घेण्यात आली. यावेळी माजी कसोटीपटू हरभजन सिंगने त्याच्याशी संवाद साधला. हरभजनने वैभवचा इथवरचा प्रवास जाणून घेतला आणि त्याचे कौतुक केले. तुझ्यामुळे भारतीय क्रिकेटमधील अद्भुत प्रतिभा पुन्हा अधोरेखित झाली असे हरभजन म्हणाला. तसेच त्याने वैभवला छानसा सल्लाही दिला. ‘‘तू इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड मेहनत घेतलीस. मात्र, मोठ्या स्तरावरील खेळाडू म्हणून तुझा खरा प्रवास आता सुरू होणार आहे. प्रतिस्पर्धी संघ तुझ्या खेळाचा बारीक अभ्यास करतील. याला सामोरे जाण्याचे आव्हान तुझ्यासमोर असेल. कष्ट करत राहा. तासनतास सराव कर आणि खूप मोठा खेळाडू हो. तुला शुभेच्छा,’’ असे हरभजन म्हणाला.

आईवडिलांच्या पाठिंब्याला मेहनतीची जोड

● अगदी लहान वयापासून मला आई-वडिलांनी दिलेला पाठिंबा, तसेच मी स्वत: घेतलेली मेहनत यामुळेच मी वयाच्या १४व्या वर्षी ‘आयपीएल’पर्यंत पोहोचू शकलो, अशी भावना वैभवने व्यक्त केली.

● ‘‘माझी सरावाची वेळ चुकू नये यासाठी माझी आई पहाटे तीन वाजता उठायची आणि मला बरोबर नेण्यासाठी डबा द्यायची. माझ्या वडिलांनी मला वेळ देता यावा यासाठी आपले काम सोडले. माझा मोठा भाऊ त्यांचे काम सांभाळतो. त्याच्यामुळेच आमचे घर चालते,’’ असे वैभव म्हणाला.

● ‘‘मेहनत घेणारे कधीही अपयशी ठरत नाहीत. मात्र, ही केवळ सुरुवात आहे. माझे राजस्थान रॉयल्ससाठी योगदान देत राहण्याचे ध्येय आहे. तसेच भविष्यात अर्थातच भारताची निळी जर्सी परिधान करायची आहे,’’ असेही वैभवने सांगितले.

बिहार सरकारकडून १० लाखांचे बक्षीस

पाटणा : ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत युवा शतकवीर ठरल्याबद्दल वैभव सूर्यवंशीचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कौतुक केले. तसेच त्याला १० लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले. गुजरातविरुद्धच्या ‘आयपीएल’ लढतीत वैभवने ३८ चेंडूंत ११ षटकार आणि सात चौकारांसह १०१ धावा फटकावल्या. ‘‘बिहारचा सुपुत्र वैभव सूर्यवंशीचे खूप अभिनंदन. अपार मेहनत आणि अलौकिक प्रतिभेच्या जोरावर तो भारतीय क्रिकेटमधील नवा आशेचा ठरतो आहे,’’ असे नितीश यांनी ‘एक्स’वर लिहिले.