पोर्ट ऑफ स्पेन : वेस्ट इंडिजविरुद्ध गुरुवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघाचे लक्ष्य निर्भेळ यश संपादन करण्याचे असेल, तर अजिंक्य रहाणेचा प्रयत्न आपली कामगिरी उंचावण्याचा राहील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉमिनिका येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने एक डाव आणि १४१ धावांनी विजय नोंदवला. विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघ डिसेंबर-जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामने खेळेल. त्यामुळे रहाणेसारख्या खेळाडूला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी आपले संघातील स्थान निश्चित करायचे झाल्यास त्याच्याकडे अखेरची संधी असेल. १८ महिन्यानंतर पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या रहाणेने जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात चमक दाखवली. मात्र, भारताने एकाच डावात फलंदाजी केल्याने डॉमिनिकामध्ये त्याला फारशी  संधी मिळाली नाही. दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघ पुन्हा एकदाच फलंदाजी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे रहाणेला या संधीला फायदा घ्यावा लागेल. कारण, दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी श्रेयस अय्यरही तंदुरुस्त होईल.

पहिला सामना तीन दिवसांच्या आत जिंकणाऱ्या भारतीय संघात बदल होण्याची शक्यता कमीच आहे. मात्र, जयदेव उनाडकटला पुन्हा अंतिम अकरामध्ये संधी मिळते का, हे पाहावे लागेल. ३१ वर्षीय उनाडकटने १३ वर्षांत तीन कसोटी सामने खेळले आहेत. डॉमिनिकामध्ये त्याला एकही गडी बाद करता आला नाही आणि त्याने नऊ षटके टाकली. पहिल्या सामन्यात रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी चुणूक दाखवली. या सामन्याची खेळपट्टीही फिरकीला अनुकूल असण्याची शक्यता आहे. विंडीज संघाने रेमन रीफरच्या जागी संघात केविन सिनक्लेयरला स्थान दिले आहे. भारतीय संघ उनाडकटच्या जागी एक आणखी फिरकीपटू म्हणून अक्षर पटेलला संधी देऊ शकतो. शार्दुल ठाकूरला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

यशस्वी जैस्वालचा प्रयत्न आपली लय कायम ठेवण्याचा राहील. शुभमन गिल मोठी खेळी करण्यास उत्सुक असेल. डिसेंबर २०१८ नंतर विदेशी खेळपट्टीवर शतक न झळकावणाऱ्या विराट कोहलीकडे सर्वाचे लक्ष असणार आहे. तर, इशान किशनही मोठय़ा खेळीसाठी प्रयत्नशील असेल. दुसरीकडे, वेस्ट इंडिजसाठी पदार्पण करणाऱ्या एलिक अथानाजे वगळता कोणत्याही फलंदाजांना भारतीय फिरकीपटूंचा सामना करता आलेला नाही. संघाला केमार रोच आणि अल्जारी जोसेफ सारख्या वेगवान गोलंदाजांकडूनही अपेक्षा असतील.

’ वेळ : सायं. ७.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : डीडी स्पोर्ट्स, फॅनकोड अ‍ॅप

रोहित क्रमवारीत दहावा

भारतीय कर्णधार रोहित शर्माने गेल्या  कसोटीत शतक झळकावताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी फलंदाजी क्रमवारीत शीर्ष दहा फलंदाजांमध्ये पुनरागमन केले आहे. तर, रविचंद्रन अश्विनने गोलंदाजी क्रमवारीतील आपले अग्रस्थान  भक्कम केले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Match preview india west indies 2nd test match start from today zws