Cricket World Cup 2023 IND vs AUS : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले होते. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात भारताचा ६ गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर विक्रमी सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषकावर आपल्या देशाचं नाव कोरलं. ऑस्ट्रेलियासाठी ट्रॅव्हिस हेडने शतक झळकवलं. हेड याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे पुन्हा एकदा भारताचं जगज्जेते होण्याचं स्वप्न भंगलं आहे. अंतिम सामन्यातील पराभवामुळे टीम इंडियातील खेळाडूंसह कोट्यवधी भारतीयांना अश्रू अनावर झाले होते. अनेक क्रिकेटप्रेमी रविवारी रात्री जेवू शकले नाहीत. अनेक लहानगे क्रिकेटप्रेमी घरातल्या टीव्हीसमोर रडतानाचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. अशीच काहीशी परिस्थिती राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या घरीदेखील होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमदार प्राजक्त तनपुरे यांची मुलगी आरोही हीदेखील क्रिकेटप्रेमी आहे. कोट्यवधी भारतीयांप्रमाणे तिलादेखील वाटत होतं भारत यंदाचा विश्वचषक उंचावेल. परंतु, भारतीय संघ अंतिम सामन्यात पराभूत झाला आणि आरोहीला अश्रू अनावर झाले. आरोही टीव्हीसमोर बसून ढसा ढसा रडू लागली. तिचे कुटुंबीय तिला समजावण्याचा, धीर देण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, तिचे अश्रू थांबत नव्हते. तसेच यंदाचा विश्वचषक हा रोहित शर्माच्या कारकिर्दीतला शेवटचा विश्वचषक असू शकतो या भावनेने तिला अधिकच रडू येत होतं. तसेच ती ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्सवरही संतापली होती. “तो पॅट कमिन्स खूप वाईट आहे” असं ती सतत बोलत होती.

हे ही वाचा >> पराभवानंतर भारताच्या ड्रेसिंग रुममधलं वातावरण कसं होतं? कोच राहुल द्रविड म्हणाला, “त्यांना तसं पाहाणं…”

दरम्यान, मुलगी आरोहीचा हा रडतानाचा व्हिडीओ आमदार प्राजक्त तनपुऱे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. तसेच आमदार तनपुरे यांनी म्हटलं आहे की, आजच्या पराभवाने कोट्यवधी भारतीयांची मनं दुखावली. माझी कन्या आरोही त्याला अपवाद नव्हती. आरोहीने आजच्या मॅचसाठी आणि भारताच्या विश्वविजेतेपदासाठी खूप तयारी केली होती. पण शेवटी खेळात आणि आयुष्यात हार-जीत चालू असते. पराभव पचवून पुन्हा उभारी घ्यायची असते. भारतीय टीम पूर्ण स्पर्धेत खूप चांगली खेळली. पण आजचा दिवस आपला नव्हता. आस्ट्रेलियन टीमचे अभिनंदन!

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla prajakt tanpure daughter arohi cried after india defeat against australia in world cup 2023 final asc