RCB vs MI Highlights in Marathi: मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यात WPL मधील अटीतटीचा सामना खेळवला गेला. या सामन्यात अखेरीस मुंबई इंडियन्सने दणदणीत विजय मिळवला आहे. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला महिला प्रीमियर लीगच्या (WPL) तिसऱ्या सत्रात पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. स्पर्धेत दमदार सुरुवात करणाऱ्या बेंगळुरूला तिसऱ्या सामन्यात माजी चॅम्पियन मुंबई इंडियन्सकडून पराभव स्वीकारावा लागला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने बेंगळुरूचा ४ गडी राखून पराभव केला. कर्णधार हरमनप्रीत कौरचे स्फोटक अर्धशतक आणि नेट सिव्हर-ब्रंटच्या झंझावाती खेळीने मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, पण १६ वर्षीय जी कमलिनीने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. जी कमालिनीने अखेरच्या षटकात विजयी चौकार लगावत संघाला शानदार विजय मिळवून दिला.

१६ वर्षीय जी कमालिनी ही यंदा जिंकलेल्या भारताच्या अंडर-१९ वर्ल्डकप संघाची सलामीवीर खेळाडू आहे. जिने संघाला चांगली सुरूवात करून देत यष्टीरक्षणाची जबाबदारी ही सांभाळली होती. आरसीबीविरूद्धच्या सामन्याच्या अखेरच्या षटकांमध्ये हरमनप्रीत कौर बाद झाल्यानंतर कमालिनीला मैदानावर उतरण्याची संधी मिळाली आणि तिने संघाला विजय मिळवून देत तिच्यावर सोपवलेली जबाबदारी चोख बजावली.

RCB vs MI सामन्यातील अखेरच्या दोन षटकांमध्ये नेमकं काय घडलं?

अठराव्या षटकात वेयरहमच्या गोलंदाजीवर हरमनप्रीत कौर आणि सजना सजीवन बाद झाल्या. यानंतर १२ चेंडूत मुंबईला विजयासाठी २२ धावांची गरज होती. दरम्यान अमनजोत कौरने पहिल्या चेंडूवर षटकार लगावला तर अखेरच्या चेंडूवरही अमनजोतने षटकार लगावत सामना अजून अटीतटीच्या वळणावर आणून ठेवला. आता मुंबईला विजयासाठी ६ चेंडूत ६ धावांची गरज होती. पहिला चेंडू डॉट बॉल गेला. दुसऱ्या चेंडूवर २ धावा केल्या, तिसऱ्या चौथ्या चेंडूवर १-१ धाव केली. तर पाचव्या चेंडूवर १६ वर्षांच्या कमालिनीने चौकार लगावत संघाला ४ विकेट्सने शानदार विजय मिळवून दिला.

आरसीबीने दिलेल्या १६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सुरूवातीलाच २ विकेट्स गमावले. पण नॅट स्किव्हर ब्रंटने ४२ धावांची वादळी खेळी करत संघाला सामन्यात कायम ठेवले. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने उत्कृष्ट खेळी खेळत ३८ चेंडूत ८ चौकार आणि एका षटकारासह अर्धशतकी खेळी केली. यानंतर अमनजोत कौरने २ चौकार आणि २ षटकारांसह ३४ धावांची नाबाद खेळी केली आणि संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. अमनजोत कौर आणि हरमनप्रीत कौर या दोघींनी ६२ धावांची शानदार भागीदारी रचली. यानंतर आलेल्या जी कमालिनीने ८ चेंडूत ११ धावांची खेळी केली.

तत्पूर्वी आरसीबीने एलिस पेरीच्या वादळी खेळीच्या जोरावर १६८ धावा केल्या. या सामन्यात बंगळुरूने स्फोटक सुरुवात केली होती. संघाची कर्णधार स्मृती मानधनाने येताच चौकार-षटकारांची आतिषबाजी केली आणि तिसऱ्या षटकात संघाला ३० धावांच्या जवळ पोहोचवले. पण त्याच षटकात ती बाद झाली, तर दुसरी सलामीवीर डॅनी व्याट-हॉज या सामन्यात अपयशी ठरली. पण एलिस पेरीच्या ८१ धावांच्या खेळीने आरसीबीला या धावसंख्येपर्यंत नेले.

एका बाजूने विकेट पडत राहिल्या पण पेरीने अवघ्या ३० चेंडूत अर्धशतक झळकावले. पेरी आणि रिचा घोष (२८) यांच्यात ५० धावांची भागीदारी झाली पण शेवटी ऑस्ट्रेलियाची एलिस पेरीएकटी लढली आणि तिने संघाला १६७ धावांपर्यंत मजल मारली. पण मुंबई इंडियन्सच्या विजयामुळे तिची वादळी खेळी व्यर्थ ठरली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai indians beat rcb by 4 wickets harmanpreet kaur fifty g kamalini amanjot kaur wpl 2025 bdg