Priety Zinta Punjab Floods: भारतातील काही राज्यांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. याचा सर्वाधिक फटका पंजाबला बसला असून, पुराच्या पाण्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक खेळाडू आणि सेलिब्रिटींनी बचावकार्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. या कठीण काळात आयपीएल स्पर्धेतील पंजाब किंग्ज संघाची मालकीण प्रीती झिंटाने देखील पंजाबमधील संकटात सापडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. प्रीती झिंटाने मदतीचा हात पुढे करत ३४ लाखांची मदत जाहीर केली आहे.
पंजाबमधील परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. लोकांचे राहण्यासह खाण्याचे देखील हाल होत आहेत. या कठीण काळात सेलिब्रिटींनी क्राउडफंडीगद्वारे पैसे जमवायला सुरूवात केली आहे. प्रीती झिंटाने ३४ लाखांची मदत केली आहे. यासह क्राउडफंडीगद्वारे २ कोटी रूपये जमवण्याचा तिचा प्रयत्न असणार आहे. राज्यातील परिस्थिती पाहता, पंजाब किंग्ज फ्रेंचायझीने हेमकुंड फाऊंडेशन आणि आरटीआयसोबत मिळून मदतकार्य राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रीती झिंटाने हाती घेतलेल्या उपक्रमाचं सर्वांकडून कौतुक केलं जात आहे. फ्रेंचायझीने क्राउडफंडीग अॅप केटोद्वारे १५ सप्टेंबरपर्यंत २ कोटी रूपये जमा करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. हे पैसे फ्रेंचायजीकडून ग्लोबल सिख चॅरीटीला दिले जाणार आहेत. जे छोट्या-छोट्या गावात जाऊन लोकांपर्यंत मदत पोहोचवण्याचं काम करतील. यासह फ्रेंचायझी मिळालेल्या पैशातून बोट देखील खरेदी करणार आहे. या बोटच्या साहाय्याने पुरात अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम केलं जाणार आहे. यासह या बोटीचा वापर आपात्कालिन परिस्थितीत लोकांना मदत करण्यासाठी केला जाईल.
या हंगामात पंजाब किंग्ज संघाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आली होती. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्जने दमदार कामगिरी करत संघाला अंतिम फेरीत पोहोचवलं होतं. पंजाबचा संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता. मात्र शेवटी या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. शेवटी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाने जेतेपदाची ट्रॉफी उंचावली. पंजाबचा संघ मैदानावरील लढत हरला. पण आता त्यांचे चाहते अडचणीत प्रीती झिंटाने इतकी मोठी मदत करण्याचा निर्णय घेत, चाहत्यांचं मन जिंकलं आहे.