Punjab Kings Retain Shashank Singh: लिलावात तांत्रिक गोंधळामुळे झालेली चूक आयपीएल संघाला महागात पडू शकते पण पंजाब किंग्ज संघाला मात्र शशांक सिंहच्या रुपात वरदानच मिळालं आहे. २०२३ हंगामापूर्वी नामसाधर्म्याच्या गोंधळातून पंजाबने शशांक सिंहला खरेदी केलं. त्यांना बदल करता आला नाही. शशांकने तडाखेबंद कामगिरी करत हंगाम गाजवला. चुकून खरेदी झालेल्या शशांकने संधीचं सोनं केल्याने पंजाबने त्यालाच ताफ्यात राखण्याचा निर्णय घेतला. पंजाबने शशांकसाठी ५.५ कोटी रुपये खर्चून ताफ्यात राखलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयपीएल रिटेन्शन सादर करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. नवा हंगाम, नवे खेळाडू, नवे प्रशिक्षक हे पंजाबचं सूत्र असतं. लिलावात प्रचंड पैसा हाताशी असल्यामुळे पंजाबचा संघ कागदावर उत्तम तयार होतो पण प्रत्यक्षात कामगिरी यथातथाच राहते. म्हणूनच सगळे हंगाम खेळूनही पंजाबला एकदाही जेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही. गेल्या हंगामात त्यांचं नेतृत्व करणाऱ्या शिखर धवनने निवृत्ती स्वीकारली आहे. त्याच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची धुरा सांभाळणाऱ्या सॅम करनला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे पंजाबने एकाही मोठ्या खेळाडूला रिटेन केलं नाही. पण त्याऐवजी त्यांनी प्रभसिमरन सिंग आणि शशांक सिंह यांना रिटेन करायचं ठरवलं. पंजाबने ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग यांच्याकडे प्रशिक्षकपदाची धुरा सोपवली आहे. त्यामुळे आगामी हंगामात पॉन्टिंग यांच्या योजनेतला पंजाब संघ मैदानावर दिसू शकतो.

लिलावात काय घडलं होतं?

डिसेंबर २०२३ मध्ये आयपीएल लिलावादरम्यान पंजाबने चुकून शशांकच्या नावावर बोली लावली होती. लिलावासाठी उपलब्ध खेळाडूंच्या पूलमध्ये शशांक सिंग नावाचे दोन खेळाडू होते. एक छत्तीसगढचा ३२ वर्षीय शशांक आणि दुसरा १९ वर्षांचा खेळाडू शशांक सिंग होता. शशांकचे नाव समोर येताच पंजाब संघाची मालकीण प्रीती झिंटाने २० लाख रुपयांच्या मूळ किंमतीवर बोली लावली. इतर संघांनी शशांकसाठी बोली लावण्यात रस दाखवला नाही. त्यामुळे शशांक पंजाबच्या संघात दाखल झाला.

शशांकला संघात सामील करून घेतल्यानंतर पंजाब संघाला जाणवलं की त्यांनी चुकीच्या खेळाडूवर बोली लावली आहे. यामुळे संघाच्या कॅम्पमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि त्यांनी लिलावकर्त्यांकडे खेळाडू बदलण्याची मागणी केली. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. पण नंतर पंजाब किंग्जने स्पष्ट केले की, गेल्यावर्षी सनरायझर्स हैदराबादने रिलीज केल्यानंतर लिलावात अनसोल्ड राहिलेला अनकॅप्ड अष्टपैलू खेळाडू त्यांच्या हव्या असलेल्या खेळाडूंच्या यादीत होता आणि त्यामुळे त्याला लिलावात चुकून खरेदी केले नाही.

शशांकने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत एकूण ५६ टी-२० सामने खेळले होते. ज्यामध्ये त्याने पाच अर्धशतके आणि १३५.५८ च्या स्ट्राईक रेटच्या मदतीने ७६१ धावा केल्या. शशांक आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स (दिल्ली कॅपिटल्स), सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सचा संघाचाही भाग राहिला आहे.

शशांकची कामगिरी

शशांकने घडलेला सगळा प्रकार विसरून जात खणखणीत कामगिरी केली. शशांकने २०२४ हंगामात १४ सामन्यात १६४.२५च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ३५४ धावा केल्या. यामध्ये २ अर्धशतकांचाही समावेश आहे. शशांकने आशुतोष शर्माच्या बरोबरीने महत्त्वपूर्ण भागीदाऱ्या रचत पंजाबला थरारक विजयही मिळवून दिले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punjab kings retain shashank singh who they picked in auction wrongly he had amazing season so was retained psp