Shubman Gill Viral Video: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. त्यामुळे भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. दरम्यान भारताचा माजी खेळाडू युवराज सिंग याने युवी कॅन फाउंडेशनतर्फे चॅरिटी डिनरचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी जगभरातील दिग्गज खेळाडूंनी हजेरी लावली होती. ज्यात भारतीय संघातील खेळाडूंचाही समावेश होता. दरम्यान या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. तो म्हणजे सचिन तेंडुलकरचं नाव पुकारल्यानंतर रवींद्र जडेजाने शुबमन गिलची फिरकी घेतल्याचा.

कर्करोग जागरूकता आणि उपचारांना पाठिंबा देण्यासाठी लंडनमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भारतीय संघातील स्टार खेळाडूंसह सचिन तेंडुलकर आणि त्याच्या कुटुंबानेही हजेरी लावली होती. कार्यक्रम सुरू असताना होस्टने सचिन तेंडुलकरचं नाव पुकारलं. त्यावेळी शुबमन गिल, रवींद्र जडेजा आणि केएल राहुल यांच्यातील संवाद कॅमेऱ्यात कैद झाला.

सोशल मीडियावर व्हायरल असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शो होस्टने सचिन तेंडुलकरला स्टेजवर बोलावलं. त्यावेळी सचिनचं नाव ऐकताच रवींद्र जडेजा शुबमन गिलला चिडवताना दिसला. केएल राहुलनेही गिलची फिरकी घेतली. माध्यमातील वृत्तानुसार, या मैत्रीपूर्ण गप्पा सारा तेंडुलकरचा संदर्भ देऊन होत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

परंतु विनोद नेमका काय होता, हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. गिल आणि जडेजाचा व्हिडीओ व्हायरल होताच, नेटकऱ्यांची नजर अंजली तेंडुलकरने दिलेल्या रिअॅक्शनवर पडली. गिल आणि जडेजाची मस्करी अंजली तेंडुलकरच्या लक्षात आली. त्यावेळी तिने चतुराईने आपली नजर दुसरीकडे वळवली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा काही नवीन नाही. याआधीही अनेकदा या चर्चा रंगल्या आहेत. आधी दोघेही एकमेकांना सोशल मीडियावर फॉलो करत होते. पण त्यानंतर दोघांनी अचानक एकमेकांना अनफॉलो केलं. तेव्हा या चर्चा कमी झाल्या होत्या. पण आता याच कार्यक्रमातील सारा आणि शुबमन गिलचा फोटो व्हायरल होताच, पुन्हा एकदा दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे.