ICC World Cup 2023, Ricky Ponting on Rohit Sharma: महान ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रिकी पाँटिंगचा विश्वास आहे की कर्णधार रोहित शर्मा भारताला त्यांच्याच भूमीवर दुसरा विश्वचषक मिळवून देऊ शकतो. सलग तीन विजयांसह भारताने आपल्या विश्वचषक मोहिमेची शानदार सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव केल्यानंतर भारताने दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा आठ गडी राखून आणि तिसऱ्या सामन्यामध्ये पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला. या तीनही सामन्यातील रोहित शर्माची कॅप्टन्सी आणि त्याने घेतलेले निर्णयांवर रिकी पाँटिंग खूप प्रभावित झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाँटिंग आयसीसीच्या पॉडकास्टमध्ये म्हणाला, “रोहित पूर्णपणे त्याच्या निर्णयांशी ठाम असून त्याला नक्की काय करायचे आहे, हे माहित आहे. तो दबावातही विचलित होत नाही, हे त्याच्या फलंदाजीतही दिसून येते. तो एक हुशार आणि चतुर फलंदाज आहे. वर्ल्डकपमध्ये दबावाला सामोरे जाण्यासाठी मैदानावर आणि बाहेर त्याने केलेल्या योजना स्पष्टपणे दिसून येतात. सामन्यातील सगळे निर्णय हे योग्य घेण्याचे कौशल्य त्याच्यात दिसत आहेत.” रोहित डिसेंबर २०२१मध्ये विराट कोहलीच्या जागी भारताचा कर्णधार झाला. रोहितच्या नेतृत्वाखाली विराट आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करू शकतो, असा विश्वास पाँटिंगला आहे.

हेही वाचा: SA vs NED: २०२२च्या टी२० विश्वचषकातील इतिहासाची नेदरलँड पुनरावृत्ती करणार का? दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय

पाँटिंग पुढे म्हणाला, “विराट हा खूप भावनिक खेळाडू आहे. तो चाहत्यांचे सगळचं ऐकतो आणि त्यांना प्रतिसादही देतो. त्याच्यासारख्या व्यक्तींसाठी हे काम थोडे अवघड गेले असते.” पाँटिंग असही म्हणाला, “रोहितला या विश्वचषकात कोणतीही अडचण येणार नाही. तो एक समंजस खेळाडू आहे आणि खूप चांगले नेतृत्व करत आहे.” टीम इंडियाने शेवटचा विश्वचषक २०११मध्ये श्रीलंकेला अंतिम फेरीत पराभूत करून भारताच्याच भूमीवर जिंकला होता.

हेही वाचा: World Cup 2023: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तान संघ बंगळुरूमध्ये दाखल, पंचतारांकित हॉटेलमधील बाबर अँड कंपनीचा Video व्हायरल

“आपल्या देशात खेळताना चांगली कामगिरी करण्याचे दडपण असते पण रोहित त्याला सामोरे जाण्यास सक्षम असल्याचे”, पाँटिंगने सांगितले. तो म्हणाला, “भारत अपेक्षांच्या दबावाखाली दबून जाणार नाही, असे म्हणता येणार नाही. हे नक्कीच होईल पण रोहित त्याला सामोरे जाऊ शकतो आणि तिथून संघाला बाहेर काढू शकतो. भारताकडे खूप प्रतिभावान खेळाडू आहेत. त्याची वेगवान गोलंदाजी, फिरकीपटू, टॉप ऑर्डर, मिडल ऑर्डर, सर्वकाही उत्कृष्ट आहे. त्यामुळे भारताला पराभूत करणे सर्व संघांना खूप कठीण जाईल.” भारताचा चौथा सामना हा १९ ऑक्टोबर रोजी पुणे येथे बांगलादेशविरुद्ध होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma is a strong captain will face pressure in the world cup ricky pontings statement avw