Rohit Sharma Performance in BGT 2024 : भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने रोहित शर्माच्या खराब फॉर्मवर प्रश्न उपस्थित केला आहे. रोहित कर्णधार नसता तर तो प्लेइंग इलेव्हनचा भाग होऊ शकला नसता, असे या माजी गोलंदाजाचे मत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत भारताचा १८४ धावांनी पराभव झाला. यासह टीम इंडियाची मालिकेत १-२ अशी पिछाडी झाली. आता मालिका बरोबरीत संपवायची असेल तर भारतीय संघाला सिडनी कसोटी (३ जानेवारी) कोणत्याही परिस्थितीत जिंकावी लागेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहितच्या खराब फॉर्मवर प्रश्न उपस्थित –

भारतीय कर्णधार रोहित शर्मासाठी ही मालिका आतापर्यंत काही खास राहिलेली नाही. तीन कसोटी सामन्यांच्या पाच डावात त्याने केवळ ३१ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या १० आहे. खराब फॉर्मशी झगडणारा रोहित आता क्रिकेट जगतातील बहुतांश दिग्गजांच्या टार्गेटवर आहे. मेलबर्न कसोटीनंतर भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाणही म्हणाला हिटमॅनचा खराब फॉर्म पाहता, जर तो कर्णधार नसता, तर प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला जागा मिळाली नसती.

इरफान पठाण रोहितबद्दल काय म्हणाला?

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना इरफान पठाण म्हणाला, “एक खेळाडू ज्याने जवळपास २०,००० धावा केल्या आहेत, तरीही रोहित ज्या प्रकारे संघर्ष करत आहे, त्यावरून असे दिसते की त्याचा फॉर्म त्याला साथ देत नाही. आता काय होतंय की तो कर्णधार आहे म्हणून खेळतोय. तो कर्णधार नसता तर कदाचित आत्ता खेळताना दिसला नसता. तुमची एक निश्चित टीम असती. केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल सलामीला खेळत असते. शुबमन गिल देखील संघात असता. वास्तविकतेबद्दल बोलायचे झाले तर, रोहित ज्या पद्धतीने खराब फॉर्मशी झगडत आहे, त्याचा विचार केला तर कदाचित त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नसते. मात्र, तो कर्णधार आहे आणि भारताला पुढचा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवायची आहे. म्हणून तो संघात आहे.”

हेही वाचा – IND vs AUS : यशस्वी जैस्वाल ऑस्ट्रेलियाला एकटा भिडला! सेहवागला मागे टाकत सचिन तेंडुलकरच्या खास विक्रमाशी केली बरोबरी

u

‘मी त्याला संघर्ष करताना पाहू शकत नाही’ –

इरफान पठाण पुढे म्हणाला, “रोहितचा फॉर्म खूपच खराब आहे. भारतात येण्यापूर्वीही तो धावा काढत नव्हता आणि अजूनही त्याने धावा केल्या नाहीत. जेव्हा मी रोहित शर्माला फलंदाजी करताना पाहतो, तेव्हा ते खूप निराशाजनक दृश्य असते. कारण जेव्हाही मी रोहित शर्माला फलंदाजी करताना पाहतो, तेव्हा मला त्याची फटकेबाजी पाहायची असते. कसोटी क्रिकेट असो वा एकदिवसीय क्रिकेट, पण आता त्याचा फॉर्म, त्याची वाटचाल, त्याची मानसिकता असो की शरीराशी असलेला समन्वय, मला ते अजिबात दिसत नाही.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma were not the captain he might not be playing xi irfan pathan big statement on rohit sharmas form vbm