Team India Playing XI Prediction For IND vs SA 2nd Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्याच कसोटीत भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार आणि प्रमुख फलंदाज शुबमन गिल मानेच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. या दुखापतीमुळे त्याला पहिल्या कसोटीतून बाहेर पडावं लागलं. याचा फटका भारतीय संघाला बसला. भारतीय संघाला दोन्ही डावात १० फलंदाजांसह फलंदाजी करावी लागली. मानेला दुखापत झाल्यानंतर गिलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान रविवारी रात्री त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मात्र तो दुसऱ्या कसोटीआधी पूर्णपणे फिट होण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे त्याला दुसऱ्या कसोटीतूनही विश्रांती दिली जाऊ शकते. दरम्यान दुसऱ्या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेईंग ११? जाणून घ्या.

कोलकाता कसोटीत भारतीय संघाच्या प्लेईंग ११ मध्ये सर्वात मोठा बदल पाहायला मिळाला. साई सुदर्शनला विश्रांती देऊन वॉशिंग्टन सुंदरला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात आलं होतं. त्याने या सामन्यातील पहिल्या डावात २९ तर दुसऱ्या डावात ३१ धावांची खेळी केली. वॉशिंग्टन सुंदरला दुसऱ्या कसोटीत प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळणार हे निश्चित आहे. पण त्याला पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळणार की नाही, हे मात्र निश्चित नाही.

गिल बाहेर झाल्यास ऋषभ पंत नेतृत्वाची जबाबदारी पार पाडताना दिसू शकतो. दरम्यान गिलची जागा घेण्यासाठी साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल ही २ नावं चर्चेत आहेत. वेस्ट इंडिजविरूद्ध झालेल्या सामन्यात साई सुदर्शनने ८७ आणि ३९ धावांची खेळी केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा साई सुदर्शनला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली जाऊ शकते. असं झाल्यास वॉशिंग्टन सुंदर पुन्हा एकदा ८ व्या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो.

मालिकेतील दुसऱ्या कसोटीसाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेईंग ११: (गिल बाहेर झाल्यास)

यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल/ नितीश कुमार रेड्डी, ध्रुव जुरेल, ऋषभ पंत (कर्णधार, यष्टीरक्षक, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज.