भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेला शुक्रवारी (२७ जानेवारी) सुरुवात झाली. मालिकेतील हा पहिला सामना रांची येथील जेएससीए स्टेडियमवर खेळला गेला. वनडे मालिकेत एकतर्फी पराभूत झालेल्या न्यूझीलंड संघाने या सामन्यात जबरदस्त पुनरागमन केले. खेळाच्या तिन्ही प्रकारात भारतीय संघावर वर्चस्व गाजवत न्यूझीलंडने २१ धावांनी मोठा विजय संपादन केला. महेंद्रसिंग धोनीच्या घरातच टीम इंडियाला पराभवाचे तोंड पाहावे लागले. या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार डॅरिल मिशेलला देण्यात आला.
पहिल्या टी२० मध्ये न्यूझीलंडने भारतावर २१ धावांनी विजय मिळवला. नाणेफेक हारल्यानंतर न्यूझीलंडने २० षटकांत ६ गडी गमावून १७६ धावा केल्या. डेव्हॉन कॉनवेने ५२ आणि डॅरिल मिशेलने नाबाद ५९ धावा केल्या. भारतीय संघ २० षटकात विकेट गमावून केवळ १५५ धावा करू शकला. भारताकडून सूर्यकुमार यादवने ४७ आणि वॉशिंग्टन सुंदरने ५० धावा केल्या. अर्शदीप सिंगने २०व्या षटकात दिलेल्या २७ धावांनी न्यूझीलंडचा आत्मविश्वास उंचावला. त्यानंतर पाहुण्यांच्या फिरकीपटूंनी भारतीय फलंदाजांना पळताभुई थोडी केली. ३ फलंदाज १५ धावांवर माघारी परतले होते आणि ‘मिस्टर ३६०’ अशी ओळख असणाऱ्या सूर्यकुमार यादव व हार्दिक पांड्या यांनी सामन्यात पकड घेतली होती. पण, ४ चेंडूंनी सामना फिरला अन् त्यानंतर भारताचा डाव गडगडला. वॉशिंग्टन सुंदरने दोन विकेट्ससह अर्धशतकी खेळी करून भारताच्या विजयासाठी पुरेपूर प्रयत्न केला.
हार्दिकच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा हा दुसरा पराभव आहे. यापूर्वी संघ श्रीलंकेकडून पराभूत झाला होता. त्याचवेळी, भारतीय संघाला जवळपास १५ महिन्यांनंतर टी२० फॉरमॅटमध्ये न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला आहे. या सामन्यापूर्वी, ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी भारताला या फॉरमॅटमध्ये किवी संघाकडून शेवटचा पराभव झाला होता. त्यानंतर दुबईत झालेल्या टी२० विश्वचषकात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला. या सामन्यात सूर्यकुमार आणि सुंदर यांच्याशिवाय भारतीय फलंदाजी फ्लॉप ठरली. सात फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. त्याचवेळी भारतीय गोलंदाजांची कामगिरीही निराशाजनक ठरली. अर्शदीपला चार षटकांत ५१ धावा कुटल्या. उमरानने एका षटकात १६ धावा, मावीने दोन षटकांत १९ धावा आणि हार्दिकने तीन षटकांत ३३ धावा दिल्या.
तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णयही अयोग्य ठरला न्यूझीलंडने भारतासमोर १७७ धावांचे लक्ष्य दिले होते. २० षटकांत किवी संघाने ६ गडी गमावून १७६ धावा केल्या. या सामन्यात अर्शदीप सिंगने खराब गोलंदाजी केली. त्याने चार षटकात ५१ धावा दिल्या आणि फक्त एक विकेट घेतली. अर्शदीप २०व्या षटकात गोलंदाजीसाठी आला आणि त्याने २७ धावा दिल्या. न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेलने ३० चेंडूत नाबाद ५९ धावांची सर्वोच्च खेळी खेळली. त्याचे हे टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक होते. त्याचवेळी डेव्हॉन कॉनवेने ३६ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. त्याचे टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे नववे अर्धशतक होते. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. त्याचवेळी अर्शदीप, कुलदीप आणि शिवम मावी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.