प्रत्येक वेळी रणजी करंडक जिंकल्यानंतर इराणी चषकावरही मोहोर उमटवण्याची मालिका विदर्भाने कायम राखली. यंदा जामठा येथे झालेल्या लढतीत विदर्भाच्या संघाने शेष भारताचा ९३ धावांनी पराभव करताना तिसऱ्यांदा इराणी चषकाचे जेतेपद पटकावले. डावखुरा फिरकीपटू हर्ष दुबे आणि वेगवान गोलंदाज यश ठाकूर यांनी दोन्ही डावांत मिळून प्रत्येकी सहा गडी बाद करत विदर्भाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

विदर्भाने विजयासाठी शेष भारतासमोर ३६१ धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर दिल्लीकर यश धूलने (११७ चेंडूंत ९२) प्रतिकार केला. त्याला सारांश जैन (३६ चेंडूंत २९) आणि मानव सुथार (११३ चेंडूंत ५६) यांची काही प्रमाणात साथही लाभली. त्यांच्या लढ्याने विदर्भाचा विजय लांबवला खरा, पण अखेरीस हर्ष दुबे (४/७३), आदित्य ठाकरे (२/२७) आणि यश ठाकूर (२/४७) यांच्या अप्रतिम गोलंदाजीसमोर शेष भारताचा दुसरा डाव २६७ धावांत संपुष्टात आला. विदर्भाने आतापर्यंत तीन वेळा रणजी करंडकाचे जेतेपद मिळवले असून त्यानंतर तीनही वेळा इराणी चषकही पटकावला आहे.

यंदाच्या लढतीत विदर्भाने पहिल्या दिवसापासूनच शेष भारताच्या संघावर वर्चस्व गाजवले. पहिल्या डावात अथर्व तायडेचे शतक आणि त्याला यश राठोडची मिळालेली साथ यामुळे विदर्भाला ३४२ धावांची मजल मारता आली. मग गोलंदाजांनी भरीव कामगिरी करताना शेष भारताला २१४ धावांत रोखले. विदर्भाने दुसऱ्या डावात २३२ धावा करत शेष भारतासमोर ३६१ धावांचे आव्हान ठेवले. मात्र, अभिमन्यू ईश्वरन (१७), इशान किशन (३५), कर्णधार रजत पाटीदार (१०) आणि ऋतुराज गायकवाड (७) या नामांकित फलंदाजांना आलेल्या अपयशामुळे अखेरीस शेष भारताला पराभव पत्करावा लागला.

आता रणजी करंडकाच्या नव्या हंगामाला १५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून विदर्भाची सलामीला तुलनेने दुबळ्या नागालँडशी गाठ पडेल.

संक्षिप्त धावफलक

विदर्भ (पहिला डाव) : ३४२

शेष भारत (पहिला डाव) : २१४

विदर्भ (दुसरा डाव) : २३२

शेष भारत (दुसरा डाव) : ७३.५ षटकांत सर्वबाद २६७ (यश धूल ९२, मानव सुथार नाबाद ५६, सारांश जैन २९; हर्ष दुबे ४/७३, आदित्य ठाकरे २/२७, यश ठाकूर २/४७)

सामनावीर : अथर्व तायडे