यंदाच्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा विजयरथ अद्याप कुणीही रोखू शकलेलं नाही. स्पर्धा सुरू झाल्यापासून भारतानं एकही सामना गमावलेला नाही. आता लीग फेरीतील शेवटचा सामना नेदरलँड्सची होत असून तिथेही भारतीय संघालाच विजयासाठी पसंती दिली जात आहे. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारतानं सलग ८ सामने जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताच्या या कामगिरीमध्ये किंग कोहलीचा मोठा हातभार राहिला आहे. कोहलीनं याच स्पर्धेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या ४९ शतकाच्या विक्रमाचीही बरोबरी केली आहे. आता विराटच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल अर्थात आयसीसीनं विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त त्याला एक आगळंवेगळं गिफ्ट दिलं आहे. विराट कोहली वाढदिवसाच्या दिवशी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कारकिर्दीतलं ४९वं शतक झळकावून सचिनच्या विक्रमाशी बरोबरी करत असताना दुसरीकडे त्याचा गेल्या वर्षीच्या वर्ल्डकपमधला एक उत्तुंग षटकार आयसीसीच्या मानकांमध्ये ‘शॉट ऑफ द सेंच्युरी’ ठरला आहे. आयसीसीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून विराटच्या या फटक्याचा व्हिडीओ शेअर केला आहे!

कसा आला विराटचा Shot of the Century?

२०२२ च्या विश्वचषक स्पर्धेत भारताला सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. या स्पर्धेत साखळी फेरीमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या प्रचंड तणावपूर्ण सामन्यामध्ये विराटच्या बॅटनं हा शॉट ऑफ द सेंच्युरी आला. पाकिस्तानविरुद्धच्या त्या सामन्यात भारताला विजयासाठी शेवटच्या ८ चेंडूंमध्ये २८ धावांची गरज होती. विराट कोहली स्ट्राईकवर असल्यामुळे भारतीयांच्या आशा अद्याप कायम होत्या. समोर पाकिस्तानचा प्रचंड फॉर्मात असलेला जलदगती गोलंदाज हारीस रौफ १९व्या षटकाचे शेवटचे दोन चेंडू टाकण्यासाठी सज्ज होता. याच षटकात विराटनं हारिस रौफला दोन उत्तुंग षटकार ठोकून सामना फिरवला. त्यातलाच एक षटकार आयसीसीनं शॉट ऑफ द सेंच्युरी म्हणून सन्मानित केला आहे.

हारिस रौफच्या षटकात पाचव्या चेंडूवर विराटनं समोरच्या दिशेनं उभ्या उभ्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर सरळ षटकार ठोकला. हा शॉट लागताच आख्ख्या स्टेडियमसह कॉमेंट्री बॉक्स आणि सामना पाहणाऱ्या घराघरांत ‘अविश्वसनीय’ अशीच प्रतिक्रिया उमटली. या शॉटवर तेव्हापासून आत्तापर्यंत बरीच चर्चा झाली. क्रिकेटच्या इतिहासातील काही अद्वितीय फटक्यांमध्ये विराट कोहलीच्या त्या षटकाराचा समावेश चर्चांमधून केला जात आहे. मात्र, आता आयसीसीनं त्या षटकाराला शॉट ऑफ द सेंच्युरी म्हणून सन्मानित केलं आहे.

VIDEO : ऑईन मॉर्गनने रवी शास्त्रींना विचारलं इंग्लंडचे प्रशिक्षक होणार का?, शास्त्री म्हणाले…

विराट कोहलीच्या पुढच्या शतकाची प्रतीक्षा!

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ आणखी किमान दोन सामने तरी खेळणार आहे. सेमीफायनलमध्ये भारतानं जिंकून यंदाच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचावं आणि तिथेही विजय मिळवत जगज्जेतेपदासोबतच या स्पर्धेत सलग ११ सामने जिंकण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाशी बरोबरी करावी अशीच तमाम भारतीय क्रीडारसिकांची इच्छा आहे. मात्र, त्याचबरोबर सचिनच्या विक्रमाची बरोबरी केलेल्या विराटनं उरलेल्या सामन्यांमध्येही शतक झळकावून पुढे सरकावं अशी क्रीडारसिकांबरोबरच खुद्द सचिन तेंडुलकरचीही इच्छा आहे!

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli six against pakistan in t20 world cup match titled as shot of the century by icc pmw