Space Shubhanshu Shukla Body Fitness : अंतराळवीर व ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी १८ दिवस अंतराळ स्थानकात वास्तव्य केले होते. त्यानंतर ते १५ जुलै रोजी पृथ्वीवर परतले. दरम्यान, पृथ्वीवर परतल्यानंतर आता शुभांशु शुक्ला पुन्हा एकदा चालण्यास शिकत आहेत, ज्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

२५ जून रोजी अॅक्सिओम-४ मोहिमेंतर्गत स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयानाद्वारे तीन क्रू सदस्स्यांसह शुभांशु शुक्ला हे अंतराळात दाखल झाले. दरम्यान, १८ दिवस अंतराळात व्यतीत केल्यानंतर १५ जुलै रोजी ते सुरक्षितपण पृथ्वीवर परतले. त्यानंतर मंगळवारी त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यात ते पुन्हा चालायला शिकताना दिसत आहेत. व्हिडीओत त्यांना चालताना खूप मेहनत घ्यावी लागत असल्याचे दिसतेय. दोन व्यक्ती त्यांना चालण्यास मदत करतायत.

त्यावर शुभांशु शुक्ला यांनी पोस्ट करीत लिहिले, “मला माझ्या प्रकृतीविषयी आणि लवकर बरं होण्यासंदर्भात अनेक शुभेच्छा मिळाल्या. मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो आणि पुढील माहितीदेखील देऊ इच्छितो.

“सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा अनुभव घेत असताना, आपल्या शरीरात द्रवपदार्थ बदलणे, हृदय गती, संतुलन पुनर्संचयित करणे आणि स्नायू कमकूवत होणे यांसारखे अनेक बदल होतात. या नवीन वातावरणाशी जुळवून घेणं सुरू आहे. एकदा शरीराला याची सवय झाली आणि आपण गुरुत्वाकर्षणाकडे परतलो की, पुन्हा एकदा सर्व गोष्टी सुरळीत होतात.”

“जरी सर्व अंतराळवीरांसाठी हे शारीरिक बदल वेगवेगळे असले तरी शरीर लवकरच त्याच्या नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यास सुरुवात करते. आपले शरीर नवीन परिस्थितीशी जुळवून घेत असतानाच्या गतीचे निरीक्षण करताना मला त्याबाबत आश्चर्य वाटते. अज्ञात जागेच्या (अवकाश) शोधात, तुम्हाला स्वतःबद्दल अधिक जाणून घेता येते.”

अंतराळातून पृथ्वीवर परतल्यानंतर शरीराला जुळवून घेण्यासाठी किती वेळ लागतो?

मुंबई येथील परळमधील ग्लेनेगल्स हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक्सचे वरिष्ठ सल्लागार डॉ. अनूप खत्री म्हणाले की, जेव्हा अंतराळवीर अंतराळातून पृथ्वीवर परत येतात तेव्हा त्यांना पृथ्वीवर पुन्हा चालता येणं तितकं सोपं नसतं. त्याला अनेक शारीरिक अडचणींचा सामना करावा लागतो.

पुन्हा चालण्याची सवय होण्यासाठी थोडा वेळ लागतो. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणी वातावरणात स्नायू आणि हाडांची तितकीशी हालचाल होत नाही, ज्यामुळे ते कमकुवत होतात. अंतराळात असताना शरीराला त्याचे संतुलन, रक्तप्रवाह व आरोग्य स्थिती जुळवून घ्यावी लागते. अगदी लहान अंतराळ मोहिमांनंतरही अंतराळवीरांना चक्कर येणे, स्नायूंमध्ये कमकुवतपणा व शारीरिक संतुलन राखणे अवघड जाते, असे डॉ. खत्री म्हणाले.

पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणात परतल्यानंतर उभे राहणेदेखील जड वाटू लागते. शरीराला अवकाशात तरंगण्याची सवय झाल्यामुळे उभे राहताना अधिक त्रास होतो. अशा वेळी शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी म्हणजे पूर्ववत होण्यासाठी फिजिओथेरपी, बॅलन्स ट्रेनिंग आणि हदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित व्यायामाची गरज असते.

अंतराळातून पृथ्वीवर परतल्यानंतर शरीराला पुन्हा मजबूत करण्यासाठी आणि नीट चालण्यासाठी काही दिवस किंवा काही आठवडे लागू शकतात. पण ही परिस्थिती व्यक्तीपरत्वे किंवा अंतराळात तुम्ही किती दिवस होता, त्याच्या कालावधीनुसार बदलणारी आहे, असेही डॉ. खत्री म्हणाले.

शरीराची झालेली झीज भरून काढणं किंवा शरीर होतं त्या स्थितीत पुन्हा आणणं हा शरीराला पूर्वपदावर आणण्याचा एक महत्त्वाचा टप्पा असतो. अंतराळ मोहिमेतून परतल्यानंतर अंतराळवीरांवर बारकाईने लक्ष ठेवले जाते. त्यांना पुन्हा पहिल्यासारखं चालता, धावता यावं व कार्यक्षम वाटावं यासाठी मदत केली जाते.