Biscuits vs Chocolates Which is Worse for Teeth : बिस्कीट आणि चॉकलेट असे पदार्थ आहेत, ज्यांना सहसा कोणीच नाही म्हणत नाही. मग ती लहान मुलं असो किंवा अगदी वयोवृद्ध. पण, अनेकदा पालक लहान मुलांना चॉकलेट खाण्यापासून थांबवतात आणि बिस्किटे खायला अगदी आनंदाने हो म्हणतात. पण, शाहरुख खान आणि हृतिक रोशन यांचे दंतचिकित्सक (डेंटिस्ट) डॉक्टर संदेश मयेकर यांनी अलीकडेच फूडफार्मर ऊर्फ रेवंत हिमत्सिंगका यांच्या पॉडकास्टमध्ये म्हटले आहे की, अनेकांच्या मते चॉकलेटपेक्षा ग्लुकोज बिस्किटे दातांसाठी जास्त हानिकारक असतात.

तर याबद्दल माहिती देत डेंटिस्ट म्हणाले की, चॉकलेटपेक्षा ग्लुकोजची बिस्किटे दातांच्या पोकळींसाठी सर्वात धोकादायक असतात. ग्लुकोज बिस्किटांमध्ये साखर असते आणि ती चिकटसुद्धा असतात; त्यामुळे ती तुमच्या दातात अडकतात आणि बॅक्टेरिया तयार होतात. बॅक्टेरिया म्हणजेच जंतू, आम्ल तयार करतात आणि शेवटी काय होते तर तुमच्या दातामध्ये छिद्र निर्माण होतात. यालाच पोकळी म्हणतात; असे डॉक्टर मयेकर म्हणाले आहेत.

तर आता याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने ठाण्यातील प्लस डेंटल क्लिनिकमधील सौंदर्यशास्त्र दंतवैद्य डॉक्टर होलिका देविकर यांच्याशी चर्चा केली. त्यांनीसुद्धा याबद्दल सहमती दर्शविली. त्यांनी नमूद केले की, जेव्हा आपण ग्लुकोज बिस्किटे खातो तेव्हा ती चिकट होऊन दातांमध्ये आणि हिरड्यांजवळ अडकतात, त्यामुळे ती जास्त काळ तोंडात राहिल्यामुळे आपल्या तोंडातील बॅक्टेरिया त्यांच्यावर त्वरित परिणाम करतात. जंतू दातांचा वरचा थर हळूहळू खरडवून शेवटी दातात भोक पाडतात; यामुळे बिस्किटे दातांसाठी हानिकारक ठरतात, विशेषतः जर ते वारंवार खाल्ले तरच…

दुसरीकडे, चॉकलेट तोंडात जलद विरघळतात. साधं दूध किंवा डार्क चॉकलेट लाळेद्वारे लवकर काढून टाकले जातात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे डार्क चॉकलेटमध्ये काही नैसर्गिक संयुगेदेखील असतात, जे बॅक्टेरिया कमी करण्यासही मदत करू शकतात; असे डॉक्टर देविकर म्हणाले आहेत.

मग नक्की याचा अर्थ काय होतो?

  • तर बिस्किटे तोंडात जास्त काळ राहतात, ज्यामुळे जास्त आम्ल आणि प्लाक तयार होतात.
  • चॉकलेट निरुपद्रवी नसतात, पण ती कमी चिकट असतात.
  • बिस्किटांच्या तुलनेत डार्क चॉकलेट हा थोडा चांगला पर्याय आहे, असे डॉक्टर देविकर यांचे मत आहे.

दातांचे नुकसान टाळण्यासाठी टिप्स

  • बिस्किटे असो किंवा चॉकलेट जास्त खाऊ नका.
  • खाल्ल्यानंतर तोंड स्वच्छ धुवा किंवा ब्रश करून घ्या.
  • जर चॉकलेट खाणार असाल तर कमी साखर असलेले गडद रंगाचे चॉकलेट खा.
  • दूध किंवा काजूबरोबर स्नॅक्स घ्या; ज्यामुळे दातांवर त्यांचे हानिकारक परिणाम होतात.
  • दररोज तोंडाची स्वच्छता करा आणि तुमच्या दातांची काळजी घेण्यासाठी डेंटिस्टला अधूनमधून भेट द्या.

डॉक्टर देविकर म्हणाले की, बिस्किटे किंवा चॉकलेट दोन्हीही दातांसाठी चांगले नाहीत. पण, बिस्किटे दातांचे जास्त नुकसान करतात, कारण ती चिकटतात आणि तोंडात जास्त काळ टिकतात, त्यामुळे बिस्किटे असो किंवा चॉकलेट, दोन्हीही कमी प्रमाणात खाणे आणि तोंडाची योग्य काळजी घेणे हे तुमच्या स्माईलचे रक्षण करण्याची गुरुकिल्ली आहे असे देविकर म्हणाल्या आहेत.